उमरगा / प्रतिनिधी-

उमरगा तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतचे निवडणूक निकाल आज जाहीर झाले. यामध्ये स्थानिक आघाडयांचा बोलबाला राहिला. यापैकी १२ ग्रामपंचायतवर सत्ता मिळाल्याचा दावा काॅॅग्रेसने केला आहे. तर ७ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत. मुरळी राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. तर वागदरीमध्ये भाजपाचे कमळ फुलले आहे. दाळींबमध्ये सेना-राष्ट्रवादी, नाईचाकुरात काॅग्रेस-सेना तर तुरोरी, कदेर, सुपतगाव ग्रामपंचायत त्रिशंकु परिस्थिती आहे.

उमरगा तालुक्यातील मुळज, बलसुर, मातोळा, जकेकुर, जकेकुरवाडी, चिंचकोटा, एकोंडी- एकोंडीवाडी, कोळसुर (गु), पळसगाव, भिकारसांगवी, बाबळसूर या आकरा गावची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध काढण्यात यश मिळाले आहे. तर उर्वरीत ३८ गावांत निवडणुक रणधुमाळीनंतर आज मतमोजणी करण्यात आली. यामध्ये पेठसांगवी, तलमोड, कुन्हाळी, गुगळगाव, बेटजवळगा, गणेशनगर, नाईकनगर, हंद्राळ, कदमापूर, जगदाळवाडी, काळा लिंबाळा, थोरलीवाडी या १२ ग्रामपंचायतमध्ये काॅॅग्रेसला घवघवीत यश मिळाले. गुंजोटी, कोळसुर, कडदोरा, समुद्राळ, व्हंताळ, कराळी, नागराळ (गुं) या ७ ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. दाळींबमध्ये सेना-राष्ट्रवादी, नाईचाकुरात काॅग्रेस-सेना, सावळसुर व डिग्गीत सेना-राष्ट्रवादी तर तुरोरी, कदेर, सुपतगाव ग्रामपंचायत त्रिशंकु परिस्थिती आहे. मुरळी राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. तर वागदरीमध्ये भाजपाचे कमळ फुलले आहे.

काॅग्रेसच्या गुंजोटी ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एम. ए. सुलतान यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पॅनेलने १२ जागेवर विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. तर काॅग्रेसला केवळ २ जागेवर समाधान मानावे लागले. माजी सैनिक पॅनेलचे २ तर एक अपक्ष विजयी झाला आहे. तुरोरी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना भाजपला आठ, काॅग्रेसचे सात दोन जागेवर व्यापारी महासंघाचे उमेदवार विजयी झाल्याने सत्तेच्या चाव्या व्यापारी महासंघाच्या ताब्यात आहेत. नाईचाकुरमध्ये सेना-काॅग्रेस आघाडीला १० जागावर विजय मिळाला आहे. सेनेचे अपक्ष २ जागी विजयी झाले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय समाधान मानावे लागले. पेठसांगवीत काॅग्रेसने चार जागा बिनविरोध काढुन ५ जागेवर विजय मिळवत ९ जागेसह ग्रामपंचायत ताब्यात ठेवली आहे. तर विरोधी पॅनेलला ३ जागा मिळाल्या आहेत. तलमोड ग्रामपंचायत निवडणुकीत काॅग्रेस नेते आश्लेष मोरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ७ जागेसह घवघवीत यश संपादन केले आहे. तर विरोधी गटाला ४ जागेवर समाधान मानावे लागले.  गुगळगाव येथे पंसचे सभापती सचिन पाटील यांचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत तर विरोधी पॅनेलला ३ जागा मिळाल्या आहेत. दाळींब ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष बाबा जाफरी व शिवसेनेने केलेल्या पॅनेलला १५ जागेवर विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. तर महाविकास आघाडीने दोन जागेवर विजय मिळवला आहे. कुन्हाळी ग्रामपंचायतची सत्ता अबाधित ठेवण्यात काॅग्रेस यशस्वी ठरली आहे. जिपचे काॅग्रेसचे प्रकाश आष्टे यांचे सात, शिवसेना दोन तर दोन जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. कदेरमध्ये काॅग्रेसचे ६, सेना-राष्ट्रवादी काॅग्रेसचे ४ तर ३ जागेसह सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती आहेत. माजी खासदार प्रा रविंद्र गायकवाड यांच्या आष्टा जहागीर येथील सातपैकी पाच जागेवर यापूर्वीच सेनेने बिनविरोध कब्जा केला होता. मतदान झालेल्या २ जागेवर विरोधी पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. रामपूरमध्ये युवकांनी केलेल्या पॅनेलच्या ७ उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर सेनेला २ जागा मिळाल्या आहेत. मुरळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता राखत ५ जागावर विजय मिळवला तर काॅग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. सुपतगावमध्ये काॅग्रेसचे ४, अपक्ष ४ तर भाजपाचा एक उमेदवार विजयी झाला आहे.  बेडगा येथे सुनिल माने यांच्या पॅनेलचे ५ तर शाहुराज माने यांच्या पॅनेलचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. येथे अर्ज दाखल केलेदिवशीच एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याने एका जागेची निवडणूक रद्द करण्यात आली होती. सावळसुरमध्ये महाविकास आघाडीचे सात पैकी सात उमेदवार विजयी झाले आहेत.

जळगाबेटला २ दोन जागा बिनविरोध आहेत.२ जागा सचिन वाडेकर यांना मिळाल्या तर वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड यांना ३ जागा मिळाल्या आहेत. वागदरी येथे भाजपाचे नाना पाटील यांनी सत्ताधारी शिवसेनेचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व जागेवर विजय मिळविला आहे. सकाळी अंतुबळी पतंगे सभागृहात मतमोजणी सुरू करण्यात आली. निकालानंतर गुलालाची उधळण करत हलगी ढोल ताशाच्या गजरात विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. निवडणूकीचा निकाल तहसीलदार संजय पवार यांनी जाहीर केला. पोलीस निरीक्षक मुकूंद आघाव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


 
Top