राज्यातील शेतकऱ्यांना सरसगट विमा देण्यात यावा, दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा व केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले कायदे तात्काळ माघारी घेण्यात यावेत यासाठी आम्ही सरकारवर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणीत आहोत . मात्र केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या प्रश्नाला बगल देऊन आपलेच म्हणणे रेटण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे सरकारने मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही, असा इशारा राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटुरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.६ जानेवारी रोजी दिला.
राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथे दि. ६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल मेश्राम, प्रदेशाध्यक्ष अर्जुनराव गालफाडे, राष्ट्रीय महासचिव आनंद नायर, प्रदेश महिला सरचिटणीस किरण बिडकर, प्रदेश सरचिटणीस मारुती गायकवाड, प्रवक्ते शामराव भगत, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बळीराम बनसोडे, कैलास साबळे विदर्भ विभागीय अध्यक्ष संजय पातोडे, राहुल डिंपलवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांना केंद्र व राज्याकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची मागणी केली होती. मात्र आता स्वतः मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी केलेल्या मागणीची पूर्तता करीत नाहीत हे खरे शेतकऱ्यांचे व राज्याचे दुर्दैव असून शेतकऱ्यांना विज बिल माफ करणे आवश्यक आहे. तसेच बऱ्याच वर्षांपासून रखडलेली कर्जमाफी तात्काळ करण्यात यावी. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री हे अनुसूचित जाती घटकाचा करणे आवश्यक असताना ओबीसी समाजाचा व्यक्ती त्या खात्यावर बसविला असून तो तात्काळ बदलला पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत २०२४ पर्यंत गावच्या सर्व समस्या कशा सुटतील ? यासाठी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे नामांतर ही केवळ राजकीय स्टंटबाजी असून त्यामुळे कुठलेही प्रश्न सुटणार नाहीत किंवा कोणाला रोजगार देखील मिळणार नाही. केवळ विकासाचे मुद्दे दुर्लक्षित व्हावेत यासाठीच ही सुरु करण्यात आलेली व असलेली राजकीय पक्षांची स्टंटबाजी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
तर गालफाडे यांनी पक्षाची भूमिका विशद करून या पक्षाचे काम तळागाळातील सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या हितासाठी असून शेतकऱ्यांना यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच अनिल मेश्राम म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना या पक्षाच्या माध्यमातून मदत केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील रस्ते अतिशय खराब झाले असून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या वाड्यावर साकडे घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आनंद नायर म्हणाले की, या पक्षाचा विस्तार लवकरच देशपातळीवर होऊन शेतकरी व कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
