उस्मानाबाद/ प्रतिनिधी
भूम पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी नाकाबंदी दरम्यान एका कारमधून ५०.३० ग्रॅम गांजा जप्त केला होता. यावेळी यातील पाहिजे असलेल्या एका आरोपीच्या घरी पोलिस व महसूल विभागाने कारवाई करून आणखी ६४.५ किलो गांजा जप्त करत पाच जणांना गजाआड केले.
ही कारवाई दि.१२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास भूम तालुक्यातील वांगी खुर्द येथे करण्यात आली. चिंचोली फाटा येथील कारवाईनंतर यातील आरोपी सुभाष आण्णा पवार (रा. वांगी (खु.) याच्या शोधार्थ भुम पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर खनाळ यांचे व परंडा पोलिस ठाण्याचे सपोनि राजकुमार ससाणे, पोना- खोसे, कळसाईन, काटवटे, महिला पोना- मुल्ला यांचे संयुक्त पथक परंडा हद्दीत फिरत होते. यावेळी सदरील पथकाने अंतरगाव रस्त्यावरील सुभाष आण्णा पवार याच्या घरावर नायब तहसीलदार श्वेता अल्हाट व २ शासकीय पंचांच्या समक्ष छापा टाकला. यावेळी सुभाष पवार याच्या घरात २२ कागदी पुडक्यांत ४८.५ किलो गांजा आढळला. तसेच अंगनात उभ्या असलेल्या इनोव्हा कार क्र. एमएच २५ एके १७७७ च्या डिक्कीत ५ कागदी पुडक्यांत १०.८ किलो तर महिंद्रा पिकअप क्र. एमएच २५ पी १२२५ च्या पाठीमागील हौद्यातील गोपनीय कप्प्यात लपवलेल्या एका पिशवीतून ६ किलो गांजा जप्त करण्यात आला. यावेळी घरात असणाऱ्या सुभाष पवार, रामदास पवार, अमोल सुभाष पवार, आण्णा रामदास पवार यांच्यासह नागेंद्रबाबु सालु जेमेल्ली (रा. विशाखापट्टनम, आंध्रप्रदेश) याला पथकाने अटक केली. याप्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
