तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उदयकाळ फाऊंडेशन आणि किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.
मागील महिन्यात तुळजापूर तालुक्यात परतीच्या पाऊसकाळात अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. यात पिकासह शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची ही दयनीय स्थिती पाहून उदयकाळ फाऊंडेशन आणि किसानपुत्र आंदोलन या संघटनेने पुढाकार घेत तालुक्यातील अपसिंगा येथील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अपसिंगा येथील दहा कुटुंबियांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उदयकाळ फाऊंडेशन आणि किसानपुत्र आंदोलनाचे नितीन राठोड, मयुर बागुल यांच्या हस्ते प्रत्येकी पाच हजार रु. चे धनादेश वितरीत करण्यात आले.
यावेळी अपसिंगा येथील ग्रामपंचायत सदस्य आमीर शेख, देविदास सौदागर यांच्यासह लाभार्थी कुटुंबीय आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
