उस्मानाबाद/ प्रतिनिधी
राज्यातील 9 वी ते 12 पर्यंतच्या शाळा व महाविद्यालय 23 नोव्हेंबरपासुन सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यापूर्वी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचे व संबंधीत स्टाफ, कर्मचारी यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे मात्र अनेक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक शाळेतील शिक्षकांच्या कोरोना तपासणीसाठी तपासणी केंद्रात रांगा लागल्या असून प्राप्त माहितीनुसार उस्मानाबाद शहरातील व उमरगा शहरातील एका शाळेत सर्वाधिक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कलमधील जवळपास 20 च्यावर शिक्षक व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर उमरगा येथील महात्मा बसवेश्वर शाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे.जिल्हयात ही आकडेवारी जवळपास 100 च्या पुढे जाण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे पॉझिटिव्ह सापडलेल्या अनेक शिक्षकात कोरोनाची कोणतीही थंडी,ताप,सर्दी व खोकला अशी लक्षणे नव्हती. अनेक शिक्षक हे असिमटोमॅटिक होते. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसुन दिवाळी व इतर सणात नागरिकांची बाजारपेठेतील गर्दी आणि कोरोना नियमाचे उल्लंघन कोरोनाला आमंत्रण देणारे ठरत आहे. राज्य सरकारने शाळा सुरू करताना कोरोना सुरक्षा नियमांची यादी तयार केली असली तरी सर्व नियम कागदावरच असल्याचे मंदिर, प्रार्थनास्थळे उघडल्यानंतर समोर आले होते. राज्यातील शाळा सुरु करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांतील शाळा सुरु करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करुनच विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे त्यामुळे राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार आहे.
9 वी ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू करताना विद्यार्थीनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी समंती आवश्यक आहे.आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहन देखील अभ्यास करता येणार आहे.विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसुन पूर्णतः पालकांच्या लेखी समतीवर अवलंबून आहे.पूर्ण उपस्थितीबाबतची पारितोषिक बंद करण्यात आली आहेत त्यामुळे शाळा सुरू झाल्यास पालक व विद्यार्थी यांचा कितपत प्रतिसाद मिळतो यावर प्रश्नचिन्ह आहे.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उपाययोजना संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरु झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पध्दती चालूच राहणार आहे. कोरोना महामारीच्या संकटात विदयार्थी आणि शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
दरेकर यांची भेट
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर शनिवार दि. २१ नोव्हेंबर रोजी उस्मानाबादेत आल्यानंतर त्यांनी कोरोनाग्रस्त शिक्षकांची शाळा असलेल्या भोसले हायस्कूलला भेट दिली. यावेळी त्यांनी दक्षता घ्या, असा सल्लाही दिली. यावेळी त्यांच्यासोबत अामदार राणाजगजितसिंह पाटील, संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड. व्यंकट गुंड, दत्ता कुलकर्णी , अॅड. नितीन भोसले, इंद्रजीत देवकते आदी उपस्थित होते.