उस्मानाबाद / प्रतिनिधी  

रुपामाता नॅचरल शुगर पाडोळी (आ) या एक हजार मेट्रीक टन प्रतिदिन क्षमतेच्या कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुक्रवारी (दि.९) हभप अॅड. पांडुरंग लोमटे महाराज, निलंग्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या हस्ते करण्यात आला.

बसवकल्याण येथील उद्योजक संजय पटवारी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला.

कारखान्याचे चेअरमन अॅड. व्यंकट गुंड यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी काळाजी गरज ओळखून शेतीमध्ये पाण्याचे शुक्ष्म नियोजन करावे. १०० टक्के ठिबकच्या सहाय्याने ऊस लागवड करावी. यामुळे पाण्याची बचत होईल, तसेच आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जमिनीपैकी पाण्याची उपलब्धता पाहून ऊस लागवड करावी. यामुळे ऊसाचे उत्पन्न ३ वर्षे घेता येईल. तसेच भविष्यात शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करुन ऊस पिकाची लागवड करावी. असे केल्यास ऊसापासून सेंद्रीय गुळ व पावडर बनवता येईल. तसेच प्रत्येक शेतकऱ्याकडे एखादी तरी गाय किंवा म्हैस असावी. असे केल्यास आपल्याला दुधाचा आहारात उपयोग करता येईल व उर्वरित दुध डेअरीला देता येईल. शेतकऱ्यांनी माझा ऊस लवकर न्या, अशी गडबड न करता गुणवत्तापूर्ण ऊसाचा पुरवठा करावा. यामुळे रिकव्हरी रेट वाढेल व वाढलेल्या रिकव्हरी मुळे शेतकऱ्यांना चांगला भाव देता येईल. तसेच त्यांना परिसरातील इतर कारखान्यापेक्षा आपण नक्कीच चांगला भाव देवू.

 यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पटवारी, शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कारखान्याचे व्हाइस चेअरमन एम. के. सूर्यवंशी, रुपामाता डेअरीचे एमडी अॅड. अजित गुंड-पाटील, पाडोळीचे उपसरपंच बाबुराव पुजारी, कारखान्याचे कार्यकारी संचालक कमलाकर घुटे पाटील, डी. डी. एनचे शेतकी अधिकारी भाऊसाहेब गुंड, मुख्य अभियंता सहदेव खोचरे, चिफ केमिस्ट नारायण निरफळ, शेतकी अधिकारी पाटील, स्ट्रक्टर डिझायनर सहस्त्रबुद्धे, रमेश वळके, माजी शेतकी अधिकारी बी. के. दादा, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सावंत, अॅड. कुदळे, परिसरातील कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत कदम यांनी केले तर आभार वाघोली येथील पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन धर्मराज पाटील यांनी मानले.


 
Top