उस्मानाबाद / प्रतिनिधी
तुळजापूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या मराठा मोर्चात चोरट्यांनी धुमाकूळ घालत लाखो रुपयांचे सोने, रोकड लंपास केली. यावेळी काही चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मराठा आरक्षण ठोक मोर्चाच्या शुक्रवारी (दि. ९) तुळजापूर येथील मोर्चाला मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला. मोर्चाच्या गर्दीत नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचे २.५ तोळ्यांचे लाॅकेट चोरट्यांनी लांबवले तर समन्वयक अर्जुन साळुंके यांच्या खिशातील २९ हजार रुपये रोख रकमेवर सुद्धा चोरट्यांनी डल्ला मारला. याशिवाय शहरातील इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक जाधव, शांताराम पेंदे यांचे सोने, मोबाइल लंपास करण्यात आले आहे. या शिवाय एका महिलेचे दागिनेही लांबवण्याचा प्रकार घडला.