उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 स्वस्तात सोने देण्याच्या अमिषाने सराफा व्यापाऱ्यांना पैसे घेऊन बोलावून त्यांना लुटणारा आरोपी चार वर्षानंतर गजाआड करण्यात वाशी पोलिसांना यश आले आहे. कळंब येथील सूवर्णकार बळीराम लक्ष्मीकांत सोनी यांना २५ ग्रॅम सोन्याचे खरे दागिने फक्त ४ हजार रुपयांमध्ये देण्यात आले होते. अजून जास्त सोने अगदी स्वस्तात पाहिजे असेल तर सरमकुंडी फाट्यापलीकडे आडबाजूला झुडपात या असे सांगन्यात आले होते. यानुसार सोनी हे दी. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी सांगितलेल्या जागी गेले असता तेथे उपस्थित असलेल्या चेहरा झाकलेल्या व्यक्तींनी सोनी यांना धक्काबुक्की करून त्‍यांच्या जवळील ८ लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला होता. सोनी यांनी याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी तपासाअंती दाखल आरोपपत्रावरून ७ आरोपींविरुध्द न्यायालयात खटलाही न्यायप्रविष्ट आहे. यातील एक आरोपी धर्मेंद्र बाबुशा भोसले (वय ४०, रा. घाटपिंप्री, ता. वाशी) हा पोलिसांना गुंगारा देत हाेता.अनेकदा प्रयत्न करूनही तो फरार झाला. दरम्यान, वाशी पोलिसांना तो घाटपिंप्री येथे आल्याची माहिती मिळाली. यावरून तातडीने कारवाइ करत त्याला ताब्यात घेऊन कोठडीत पाठवले.


 
Top