उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडीअडचणीसंदर्भात नुकतीच जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार, माजी आमदार तथा संचालक राहुल मोटे यांच्यासह शिष्टमंडळाने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सहकारमंत्री पाटील यांनी जिल्हा बँकेला पूर्वपदावर आणण्यासाठी मदतीचे आश्वासन देत तेरणा साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासंदर्भात तातडीने निविदा प्रक्रीया करा असा आदेश साखर आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी दिली आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा बँकेच्या अडचणीसंदर्भात चेअरमन सुरेश बिराजदार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी शरदचंद्र पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना याअनुशंगाने बैठक बाेलावून सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दि.३० सप्टेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी बैठकीत चेअरमन सुरेश बिराजदार व माजी आमदार राहुल मोटे यांनी जिल्ह्याच्या तसेच बँकेच्या दृष्टीने महत्वाच्या तेरणा व श्री तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालु करण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी सहकारमंत्र्यांनी तेरणा साखर कारखाना तातडीने भाडेतत्वावर देण्यासंदर्भात निविदा प्रसिद्ध करण्याचे आदेश साखर आयुक्तांना दिले. यावेळी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासोबत सहकार व बँकेच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून तेरणा साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा विषय मार्गी लावण्याबाबतही चर्चा झाली. यावेळी चेअरमन बिराजदार यांनी शासनाकडे बँकेचे शासकीय भागभांडवलापोटी सादर असलेला १६.०३ कोटींचा प्रस्ताव, तसेच कारखान्याच्या थकहमीपोटी उपमुख्यमंत्र्यांनी सुचविलेल्या तडजोडीचा सादर प्रस्ताव याबाबत शासनाने निर्णय घेऊन ही रक्कम बँकेला अदा करण्याची विनंती केली. यावेळी सहकारमंत्र्यांनीही बँकेला पूर्वपदावर आणण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे व शासकीय देणे असलेला प्रस्ताव लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी सहकार विभागाचे ओएसडी संतोष पाटील, सहकार आयुक्त, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख, जिल्हा बँकेचे उपसरव्यवस्थापक व्ही.बी.चांडक आदी उपस्थित होते.


 
Top