कळंब / प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखाना युनिट-१ च्या अाठव्या गळीत हंगामाला शेतकऱ्यांच्या हस्ते मोळी पूजनाने रविवारी (दि.४) शुभारंभ करण्यात आला.कारखाना क्षेत्रातील ११ प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते उसाची मोळी टाकून या हंगामाचा शुभारंभ झाला.

या वेळी चेअरमन अभिजित पाटील बोलताना म्हणाले की, गेल्यावर्षी दुष्काळग्रस्त परिस्थिती असतानाही कारखाना चालवून येथील शेतकऱ्यांना, कामगारांना कारखान्याने न्याय दिला. गेल्यावर्षी सन २०१९-२० च्या हंगामात एफआरपीपेक्षा जास्त २५०० रुपये दर जाहीर केल्याप्रमाणे पहिला हप्ता २१०० रूपये तर पोळा सणासाठी २०० रुपये अशी एकूण २३०० रुपयांची रक्कम अदा केली तर उर्वरित रक्कम दिवाळीत देऊ असे सांगितले.तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही कारखान्याची कामे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ करुन त्यांना गाळप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ४ लाख मे.टन ऊस गाळपाचा मानस अाहे. कारखाना स्थळावर कोविड सेंटरची सोय केली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी शेतकरी बाळासाहेब पाटील, धनंजय गायकवाड, अमोल जोगदंड, प्रदीप सस्ते, रविराजे देशमुख, रणजित कवडे, भास्कर पुरेकर, सुनिल पाटील, तात्यासाहेब भिंगडे, महादेव कवडे, अनिल पाटील यांच्यासह समीर दुधगावकर, मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे, ॲड. विजय निरस, ॲड. विठ्ठल भिसे, पंढरपूरचे बाबुराव जाधव, आदिनाथ मुलाणी, खंडेराव मैंदाड, उपसरपंच पांडुरंग मैंदाड, मनसेचे शशिकांत पाटील, औदुंबर वाघ, ज्ञानेश्वर कांबळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक सुरेश सावंत, संतोष काबंळे, दीपक आदमिले, विकास काळे, यांच्या उपस्थितीत काटा पूजन करून ऊस भरून आलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले व नंतर गव्हाणीत मान्यवरांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली.


 
Top