उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट लक्षात घेवून दरमहा ३०० युनिट्सच्या आत वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील सहा महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करण्याची मागणी जनता दल सेक्युलरचे प्रदेश कार्याध्यक्ष तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अॅड. रेवण भोसले यांनी केली आहे.

यासंबंधी मंगळवारी (दि.२७) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात गरीब, कष्टकरी, कनिष्ठ मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीयांचे रोजगार गेले, काहींचे व्यवसाय बंद पडले. त्यामुळे त्या तीन महिन्यांची आणि अनलॉक सुरू झाल्यावर महावितरणच्या वतीने वीज ग्राहकांना दरवाढीचा झटका देण्यासह अव्वाच्या सव्वा वीजबिले देण्यात आली. यामुळे जनतेत असंतोष आहे. त्यामुळे ही तीन महिन्यांची अशी सहा महिन्यांची वीजबिले माफ करावी. कोरोनाच्या परिस्थिती पिचलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारच्या वतीने काही प्रमाणात दिलेले मोफत धान्य वगळता कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आलेली नाही. केरळ, मध्यप्रदेश व गुजरात सरकारने घरगुती वीजबिलात ५० टक्के सवलत दिली आहे. परंतु पुरोगामी महाराष्ट्राने जनतेला दिलासा देण्यासाठी कोणताही निर्णय घेतला नाही. जनता आर्थिकरित्या पिचलेली असताना महावितरण, बेस्ट, अदाणी, टाटा पॉवर या वीज कंपन्यांनी दरमहा वीज देयके पाठवून थकबाकी भरण्यासाठी ग्राहकांकडे तगादा लावला आहे. बिलातील वाढीबद्दल व वीज दरवाढीबद्दल जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे दरमहा ३०० युनिट्सपर्यंत वीज वापर असणाऱ्या सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील सहा महिन्यांची देयके माफ करुन त्यासाठी आवश्यक रकमेची भरपाई राज्य सरकारने महावितरण वा संबंधीत कंपनीस अनुदान स्वरुपात द्यावी.


 
Top