उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यातील धनगर समाजाला एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी त्वरीत करण्याबरोबरच इतर विविध मागण्यासाठी धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने मोर्चा काढून ढोल वाजवित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन दि. ६ आक्टूबर रोजी करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील धनगर समाजाल गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एस.टी. प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा तसेच जिल्हयातील समस्त धनगर समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, या मार्गावावर ढोल ताशाच्या गजरात व विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडत पायी मोर्चा काढून सरकारला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या विविध मागण्यात  धनगर समाजाला एस.टी. आरक्षणाची सवलत आदेश काढून त्वरीत अंमलबजावणी सुरु करावी,मेंढपाळावरील हल्ले थांबवावेत, त्यासाठी त्वरीत कडक कायदा करावा व मेंढपाळांना शस्त्र परवाना मोफत देऊन शस्त्र देण्यात यावे, उच्च न्यायालयात धनगर आरक्षणाच्या संबंधित असलेली याचिका दैनिक सुनावणीस घेवून लवकर निकाली काढावी,  जे आदिवासींना ते धनगर समाजाला या धर्तीवर सर्व आदिवासींच्या योजना धनगर समाजाला त्वरीत लागु करण्यात याव्या, धनगर समाजाला एस.टी. प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्यात यावे आदी मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे. 

या मोर्चामध्ये अा.गोपीचंद पडळकर, गणेश हाके, सुरेश कांबळे, भारत ढोलारे, गणेश सोनटक्के, अर्जुन सलगर, खंडेराव मैंदाड यांच्यासह समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top