उस्मानाबाद/ प्रतिनिधी

स्टेट इनोव्हेशन अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सर फाऊंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२०’ देशभरातील १६९ प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांना जाहीर झाला आहे. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती, विषय सहाय्यक, शिक्षण विस्तार अधिकारी. गटशिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता डाएट यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्र राज्यातून प्राथमिक गटात (१०३), माध्यमिक गटात (२२), क्षेत्रीय अधिकारी गटात (१३) इतर विभाग (०६) देशभरातील १६ राज्यांसह एकूण (१६९) जणांचा समावेश आहे. अशी माहिती सर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य समन्वयक हेमा शिंदे, बाळासाहेब वाध, सिद्धाराम भाशाळे यांनी दिली.

सर फाऊंडेशनने शिक्षण विषयक अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत. रवि जे । मथाई सेंटर फॉर एज्यूकेशनल इनोव्हेशन भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद, हनी बी नेटवर्क, सृष्टी अहमदाबाद, डाएट व शालेय शिक्षण विभाग यांच्या सोबत विविध उपयुक्त उपक्रम प्राथमिक शिक्षणासाठी राबविले आहेत.

सर फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘राष्ट्रीयस्तर नवोपक्रम स्पर्धा २०२०’ मधून या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. ‘एज्युकेशन इनोव्हेशन बँक’ या प्रकल्पांतर्गत हे अवॉर्ड जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर तज्ज्ञ कमिटीमार्फत ही निवड केली जाते.


 
Top