उमरगा/ प्रतिनिधी
चोरीच्या घटनेतील आरोपींकडून सोने खरेदी केल्याप्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिस पथकाने बुधवारी (दि. २८) उमरगा शहरातील एका सराफ दुकानदाराकडे चौकशी सुरू केली. याबाबत माहिती मिळताच शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी तेलंगणा पोलिसांना विरोध करत पथकास घेराव घातला. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याबाबत माहिती मिळताच उमरगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित पोलिसांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून बाहेर आणले.
या बाबतची माहिती अशी की, सन २०१७ मध्ये हैदराबाद येथील एका चोरी प्रकरणातील आरोपीस हैदराबाद पोलिसांनी अटक करून चौकशी सुरू केली आहे. यावेळी त्याने सदरील चोरीतील ४० तोळे सोने उमरगा येथील एका सराफ व्यापाऱ्यास विकल्याची माहिती पोलिसांना दिली. यावरून हैदराबाद पोलिसांचे दोन अधिकारी व दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक बुधवारी दुपारी सराफ लाईनमधील एका व्यापाऱ्याकडे चौकशीसाठी गेले. याबाबत माहिती मिळताच तेथे जमलेल्या अन्य व्यापाऱ्यांनी याला विरोध करत पोलिसांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तास पोलिस व व्यापाऱ्यांत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. यामुळे सराफ लाईनमध्ये मोठी गर्दी, गोंधळ सुरु असल्याने पोलिस उपनिरीक्षक ए. टी. मालुसूरे आणि इतर स्थानिक पोलिस तेथे दाखल झाले.त्यांनी तेलंगणा पोलिसांची या घेराव्यातून सुटका करत पोलिस ठाण्यात आणले. यावेळी सराफ व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. या संदर्भात सराफ व्यापारी दिलीप पोतदार यांनी सांगितले की, ऐन दिवाळीत प्रत्येक वेळी तेलंगणा पोलिस कोणत्या तरी आरोपीस आणून व्यापाऱ्यांस पकडून घेऊन जातात आणि चौकशीच्या नावाखाली छळवणूक करतात. दरम्यानए संबंधित प्रकरणाविषयी चौकशी करण्यासाठी हैदराबादचे पोलिस रात्री उशीरापर्यंत उमरग्यात थांबून होते. याबाबत पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांनी सांगितले की, तेलंगणा पोलिसांनी प्रथम तोंडी माहिती देऊन चौकशीला गेले. लेखी माहिती अाणि प्रकरणाची पार्श्वभूमी सांगायला हवी होती. नंतर त्यांनी लेखी पत्र दिले. त्यांना येथील पोलिस सहकार्य करतील असे सांगितले.दरम्यान, या प्रकाराने उमरगा शहरात तणावाची परिस्थती निर्माण झाली होती.