उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजाला आधार देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. पवारांच्या या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. शिवसेना आमदार ज्ञानराज चौघुले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीला गेली. अज्ञात चोरट्याने ही चेन लंपास केली. आमदारांचीच चैन लंपास झाल्याने सर्वत्र एकच धांदल उडाली.  आज तुळजापूरमधून शरद पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात शरद पवार यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी अधिकारी देखील आहेत. उमरगा तालुक्याचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौघुले देखील पवारांसोबत आहेत. चौगुले यांच्या गळ्यात 4 तोळे वजनाची चेन होती. या चेनीची किंमत जवळपास 2 लाख रुपये होती. मात्र गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने आमदार चौगुलेंच्या गळ्यातील चेन लंपास केली.  चेन चोरीला गेल्यानंतर आमदार चौगुले यांनी याप्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दिलेली नाहीये. मात्र झाल्या प्रकाराने यंत्रणेची चांगलीच धापवळ उडाली. खुद्द आमदार साहेबांचीच चेन लंपास झाल्यानंतर पोलिस सतर्क झाले आहेत.

शरद पवार आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना शरद पवारांनी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अतिवृष्टीमुळं झालेलं नुकसान मोठं आहे. या संकटावर एकत्रितरित्या मात करायला हवी. आपण भूकंपासारख्या संकटाला तोंड दिलं आहे, त्यामुळं धीर धरा, अशा शब्दात पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.


 
Top