उमरगा तालुक्यातील विटभट्टीवर काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाना तात्काळ अटक करण्यात यावी. सदर महिलेचे पुनर्वसन करण्यात यावे. महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलांच्या अब्रुची लक्तरे तोडण्यात येत आहेत. हाथरस घटनेवर मोर्चे काढणारी शिवसेना व काॅंग्रेस राज्यातील घटनावर गप्प का आहेत ? महिला आयोगाला अध्यक्ष नेमावा व राज्यात तात्काळ दिशा कायदा लागू करावा अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही असा इशारा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी दिला आहे.
उमरगा नगरपालिकेत शुक्रवारी (दि.९) रोजी पिडीत महिला व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. चार दिवसांत दहा महिलावर अत्याचार झाले आहेत. यातील अनेक आरोपी अद्याप फरार आहेत. फेब्रुवारीमध्ये ७ महिलांना जिवंत जाळण्यात आले. यातील चौघींचा मृत्यू झाला आहे. तर आॅगस्टमध्ये ११ महिलावर अत्याचार झाले आहेत. यातील बहुतांश आरोपी फरार आहेत. महिलांच्या गुप्तांगातुन श्वॅस घेण्याचे किळसवाणे प्रकार राज्यात घडत आहेत. राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हाथरसमधील घटनेविरोधात मोर्चा काढणारे काॅग्रेस व शिवसेनेचे नेते महाराष्ट्रातील घटनेवर गप्प का आहेत ? हाथरस घटनेचा निषेध करुन कोणत्याही महिलेवर अन्याय अत्याचार होणार नाहीत यासाठी दिशा कायदा करणे गरजेचे आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असताना राज्यात महिला आयोगाला अध्यक्ष मिळत नाही हे दुर्दैव आहे. राज्य सरकारकडे इच्छाशक्तीच्या अभावामुळे दिशा कायदा मंजूर केला जात नाही. उमरगा तालुक्यातील विटभट्टीवर अत्याचार झालेल्या पिडीत महिलेला मानसिक आधार देऊन तिचे पुनर्वसन करण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी गरड, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, तालुका उपाध्यक्ष अनिल बिराजदार आदी उपस्थित होते.