उमरगा / प्रतिनिधी-

 शहरासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना असूनही योग्य नियोजन अन कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता, त्यात सातत्याने जलवाहि नीची गळती, वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा आदी कारणाने सुरळीत पाणीपुरवठ्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. कायमस्वरूपी पाणी पुरवठा  योजने शिवाय एका प्रकल्पात अतिवृष्टीमुळे मुबलक पाणीसाठा असुनही नियोजना अभावी वेळेत पाणी उपलब्ध होत नसल्याने शहरवासियांतून तक्रारी येत असल्याने प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्याच्या दिवसात शहरातील बहुतांश भागात दहा दिवसा आड पाणीपुरवठा होत आहे. शहराची लोकसंख्या साठ हजारांपेक्षा अधिक असून अनेक भागात हद्दवाढ झाल्याने लोकवस्ती वाढली आहे. गेल्या आठ वर्षापूर्वी लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा धरणातून कायमस्वरूपी योजना कार्यान्वित झाली. ऐन पाणीटंचाईच्या काळात ही योजना शहरवासियांसाठी उपयुक्त ठरली असलीत री निकृष्ठ कामांमुळे जलवाहिनीच्या फुटीची, गळती ची चर्चा आजही होत असते.शहरासाठी कार्यान्वित झालेल्या कायमस्वरूपी योजनेत उन्हाळा,पावसाळा कायम विज पुरवठ्याची समस्या आजही कायम आहे. पालिका प्रतिमहिना सात ते आठ लाख रुपये वीजबिल भरते.माकणी धरणातील उद्भव विहिरीवर वीजपंपासाठी ३२५ केव्ही क्षमतेचे रोहित्र आहे. त्या ठिकाणी सास्तूर उपकेंद्रातील एक्स्प्रेस फिडरवरून विद्युत जोडणी असून रात्रीच्या वेळी अधिक दाबाने वीज मिळते. शहरात चार ठिकाणच्या जलकुंभात जवळपास वीस लाख लिटर पाणीसाठा होत असतो तो दुपारी बारापर्यंत काही मोजक्या भागातच संपते, अशा पद्धतीच्या नियोजनामुळे शहरात पाण्यासाठी नेहमीची ओरड सुरू असताना मुख्याधिकारी आणि पदाधिकारी यांच्याकडून कायमस्वरूपी उपाययोज ना केल्या जात नाहीत.

 खर्च अवाढव्य तरीही ताळमेळ नाही 

पावसाळ्यातही वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड शहराच्या अनेक वस्तीतील नागरिकांची होत आहे. माकणी धरणात पाणी आहे, कोरेगाव तलाव पूर्ण भरलेला आहे. मात्र नळाला वेळेत पाणी मिळत नाही. पालिकेकडून पाणीपुरवठ्यासाठी दर महिना दहा लाखापेक्षा अधिक खर्च होत असताना किमान चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन होत नाही. दरम्यान शहरात वेगवेगळ्या चार ठिकाणी १९ लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ आहेत. पालिकेने सरकारी दवाखान्याच्या परिसरात साडेसात लाख लिटर क्षमतेच्या नवीन जलकुंभाचा प्रस्ताव तयार ठेवला आहे. मात्र निधी उपलब्ध नसल्याने पडून आहे.


 
Top