उस्मानाबाद/ प्रतिनिधी
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.५) जिल्हाधिकारी कार्यालयासमर सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली स्थगिती लवकरात लवकर उठवून आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, कोपर्डीतील ताईला न्याय देण्यासाठी आरोपींना तातडीने फाशी द्यावी, केंद्र सरकारने मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी भारतीय संविधानात योग्य ती दुरूस्ती व तरतूद करावी,अॅट्रॉसिटी अॅक्टबाबत ज्याप्रमाणे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून निर्णय घेतला त्याच पद्धतीने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा यासह विविध दहा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. या मागण्यांसदर्भात तातडीने निर्णय न झाल्यास येत्या काळात थेट दिल्लीत मराठ्यांचा मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.