उस्मानाबाद / प्रतिनिधी
सत्य आणि अहिंसा तत्त्वाचा आयुष्यभर पुरस्कार करणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी अर्थात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती उस्मानाबाद जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सार्वजनिक सभाग्रहामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते मोहनदास करमचंद गांधी तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोहनदास करमचंद गांधी तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आत्मशुद्धी सह राजकीय चळवळीसाठी साधक म्हणून वेळोवेळी उपोषणाचा मार्ग अवलंबला. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या स्वतंत्र संग्रामाच्या आंदोलनात लालबहादूर शास्त्री यांनी उडी घेतली आणि विद्रोही मोहिमेचे नेतृत्व केले.जय जवान जय किसान चा नारा देऊन शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आत्मसन्मान देण्याचे काम लाल बहादूर शास्त्री यांनी केले.
गांधी आणि शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अनंत कुंभार,स्वयं शिक्षण प्रयोग युनिसेफच्या जिल्हा सहयोगीनी नसीम शेख यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी, विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.