उस्मानाबाद / (प्रतिनिधी) - केंद्र सरकारने घाईघाईत शेतकरी विरोधी कायदे संमत केले असून हे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. या कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या  शेतीमालाला हमीभाव मिळू शकणार नाही त्यामुळे शेतकरी उध्वस्त होईल, हे थांबविण्यासाठी काँग्रेसने देशपातळीवर याविरोधात आंदोलन सुरू केले असून हे काळे कायदे रद्द होईपर्यंत सातत्याने आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा ठाम निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री बसवराज पाटील यांनी व्यक्त केला.

केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदे हुकूमशाही पध्दतीने पारित केले असून ते कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने राज्यभर "किसान बचाव दिवस" पाळला जात आहे. याचाच भाग म्हणून उस्मानाबाद येथे दि.३१ ऑक्टोबर रोजी येथील जिल्हा काँग्रेस भवनसमोर बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली  "सत्याग्रह" आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळु, माजी जि.प.सभापती मुकुंद डोंगरे, पं.स.सभापती शिवाजीराव गायकवाड उपस्थित होते.

पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, या कायद्या विरोधात यापूर्वी आम्ही विविध आंदोलने केले असून आजही आम्ही या कायद्या विरोधात सत्याग्रह करीत आहोत. त्यामुळे केंद्र सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करणे घातक ठरणार असून या कायद्याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी होऊ नये. हा कायदा जर उद्या अस्तित्वात आला तर शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय होऊन समस्त कृषी व्यवस्थेवर दूरगामी वाईट परिणाम होतील.

त्यामुळे हा कायदा तात्काळ रद्द करणे आवश्यक असून जोपर्यंत केंद्र सरकार हा कायदा रद्द करीत नाही. तोपर्यंत आम्ही या कायद्याच्या विरोधात सातत्याने आंदोलने सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.  


शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा कायदा - मधुकरराव चव्हाण


यावेळी बोलताना मधुकरराव चव्हाण म्हणाले की, हा जो केंद्र सरकारने केलेला कायदा आहे. तो शेतकऱ्यांच्या विरोधातील असून हा कायदा रद्द होईपर्यंत काँग्रेसचा केंद्रातील भाजप सरकार बरोबर संघर्ष चालूच राहणार आहे. तसेच यासाठी रस्त्यावर उतरून सर्व प्रकारे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देऊन ते म्हणाले की,  पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून जसे जसे आदेश दिले जातील तसे आंदोलन करण्यात येईल. विशेष म्हणजे या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पडणार असून मार्केट कमिट्या उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत.  शेतकऱ्यांना देखील उद्ध्वस्त करण्याचे काम या कायद्याच्या माध्यमातून केले जात असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

या आंदोलनात प्रशांत पाटील, आशिष मोदाणी, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, जावेद काझी, शहाजी मुंडे सर, धनंजय राऊत, राजेश शिंदे, अवधूत शिरसागर, देवानंद एडके, गोरोबा झेंडे, राजू स्वामी, अब्दुल लतिफ, मोईज शेख, सुभाष हिंगमिरे, मिलिंद गोवर्धन, अनंत घोगरे, राहुल लोखंडे, कृष्णा तवले, प्रसन्न कथले, इलियास खान, मेहबूब खान, सौरव गायकवाड, प्रेम सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.

सदरील आंदोलन मास्क व सॅनिटायझरचा वापर करून शासनाच्या नियमांचे पालन करत पार पडले.


 
Top