उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 येरमाळा पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना केवळ बुरखाधारी चोरट्याच्या चालण्याच्या लकबीवरून चोरीच्या गुन्ह्याच्या उलगडा करत आरोपीला गजाआड केले.

वाशी तालुक्यातील धनंजय पांडुरंग घोळवे (रा. तेरखेडा) यांचे रत्नापूर फाट्याजवळ पांडुरंग हॉटेल आहे. या हॉटेलच्या खिडकीचा काच अज्ञात चोरट्याने दि.७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री फोडून आतील सीसीटीव्ही- संगणकाचा डेल कंपनीचा १९ इंची एलसीडी स्क्रीन चोरुन नेला होता. याप्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना परिसरातील एका सीसीटीव्हीचे छायाचित्रण मिळाले. यात एक चेहरा झाकलेला बुरखाधारी तरूण चोरी करून जात असल्याचे आढळले. चेहरा झाकलेला असल्याने त्याची ओळख पटत नव्हती. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे यांनी ते सीसीटीव्हीचे छायाचित्रण अनेकदा बघीतले. यावेळी छायाचित्रणातील तरुणाचा बांधा व चालन्याची लकब पाहता अशा लकबीची व्यक्ती पाहील्याचे त्यांना जाणवले. तो तरुण येरमाळा येथील एका व्यायाम शाळेजवळून अनेकदा जात असताना त्यांनी पाहिल्याचे त्यांना आठवले. यावर त्यांनी व्यायामशाळा परिसरातील लोकांना ते सीसीटीव्ही छायाचित्रण दाखवून याबाबत माहिती घेतली. यावर लोकांनी सीसीटीव्हीतील बुरखेधारी आरोपीचा बांधा व चालन्याची लकब पाहून तो तरुण आनंद लक्ष्मण वाघमारे (रा. रत्नापूर) येथील असल्याचे व सध्या तो पुण्यास नोकरीस गेला असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पुण्यातील पत्ता शोधून त्यास ताब्यात घेत चोरीतील एलसीडी त्याच्याकडून जप्त केला.

 
Top