उस्मानाबाद/ प्रतिनिधी

डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील किटक शास्त्रज्ञांच्या मते पुढील काळात वातावरणातील अदलामुळे कापुस पिकांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुलाबी बोडअळीच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कापुस पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन शेतक-यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

कापुस पिकामध्ये एकरी २ किंवा हेक्टरी ५ फेरोमन सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळयामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.फुलावस्थेत दर आठवडयाने पिकामध्ये मजुरांच्या सहाय्याने डोमकळया (गुलाबी बोंडअळी ग्रस्त फुले) शोधून नष्ट कराव्यात.५ टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझॉडीरेक्टीन ०.०३ (३०० पीपीएम) ५० मिली किंवा ०.१५ टक्के ( १५०० पीपीएम) २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.प्रत्येक आठवडयाला एकरी शेतीचे प्रतिनीधीत्व करतील. अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे,मध्यम पक्व झालेले, बाहेरून किडके नसलेले एक बोंड असे २० बोंडे तोडून ते भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडके बोंड व अळयाची संख्या मोजावी.

जर दोन किडके बोंड किंवा दोन पांढूरक्या / गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळया आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी ( ५ ते १० टक्के ) समजून खाली सांगीतल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

थायोडीकार्ब ७५ टक्के डब्ल्युपी २५ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के एएफ २५ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २५ टक्के प्रवाही २५ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के ३० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के १० मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ टक्के १० मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.जेथे प्रादुर्भाव १० टक्केच्यावर आहे. अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढु नये. म्हणून खालीलपैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ट्रायझोफॉस ३५ टक्के + डेल्टामेथ्रीन १ टक्के १७ मिली किंवा क्लोरॅट्रालीनिलीप्रोल ९.३ टक्के + लँब्डासायहॅलोथ्रीन ४.६ टक्के ५ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन ५ टक्के २० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के + अॅसीटामाप्रीड ७.७ टक्के १० मिली.अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,.यु.आर.घाटगे,यांनी केले आहे.


 
Top