उस्मानाबाद/ प्रतिनिधी

महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना युद्धपातळीवर मदत करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दुष्काळ, अतिवृष्टी व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात तर पूर व अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. या वर्षीचा खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला असून जवळपास सर्वत्रच अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे .बहुतांशी पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे . अगदी  काढणीच्या वेळेस पाऊस पडल्यामुळे शेतातच मुगाला कोंब फुटले. त्याचप्रमाणे अतिपावसामुळे कपाशी, सोयाबीन, ऊस, मका, उडीद, मूग आदि पिकांची नासाडी झाली आहे. या नासाडी मुळे कर्ज काढून शेतकऱ्यांनी घेतलेली खते  व बियाण्यांचे पैसेही वसूल होणार नाहीत .अद्याप पिक नुकसानीचे पंचनामे ही मोठ्या प्रमाणात झालेले नाहीत. त्यातच शासकीय कर्मचारीही कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांची भेट घेण्यासही पंचनाम्याच्या कामास टाळाटाळ करीत आहेत .त्यामुळे आधीच विविध कारणामुळे संकटात सापडलेले शेतकरी आस्मानी व सुलतानी संकटांमुळे हतबल झाले आहेत. त्यामुळे या सर्व बाबीचा विचार करून राज्यात तात्काळ  ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी अशी विनंतीही ॲड भोसले यांनी केले आहे .


 
Top