उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या देणगीतून ऑक्सिजन प्लांट उभारण्याची मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या सिव्हिलमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा कमी होत आहे. जेथे ऑक्सिजन प्लांट आहे तेथेही ऑक्सिजनची निर्मिती, सिलिंडर वाहतुक व सिलिंडरची उपलब्धता योग्य प्रमाणात होत नसल्याने दक्षता विभागातील कोरोना रुग्ण व अतिदक्षता विभागातील रुग्ण यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करणे रुग्णालय प्रशासनास कठीण होत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून आवश्यक वैद्यकीय साधनसामुग्रीचा अभाव व तुटवडा होत आहे. जालना येथे महिको कंपनीने त्यांच्या सामाजिक सुरक्षा निधीतून अशा ऑक्सिजन प्लांटची देणगीतून उभारणी केलेली आहे. याच धर्तीवर तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने सिव्हिल रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारला तर ३०० रुग्ण सेवेला (बेडला) ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकतो. ही जीवनरक्षक प्रणाली उभारल्यास अनेक अत्यावस्थ रुग्णांचे प्राण वाचू शकतील. त्या अनुषंगाने तुळजाभवानी मंदिर ट्रस्टची तातडीची बैठक आयोजित करून यासाठी आवश्यक निधी मंजुर करून द्यावा याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी तथा श्री. तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यांच्याकडे खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

 
Top