उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 उस्मानाबाद दि.16 (जिमाका):- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. उस्मानाबाद जिल्हा व महाराष्ट्र राज्याचा सध्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर समान असून उस्मानाबाद जिल्ह्याचा हा मृत्युदर दीड टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकराव गडाख यांनी दिले.
कोरोना संदर्भात येथील सर्कीट हाऊस मध्ये बुधवारी (दि.16) सायंकाळी पालकमंत्री गडाख यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, आ. सुजितसिंह ठाकूर, आ. राणा पाटील, आ. विक्रम काळे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर , निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डि.के.पाटील, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रकाश खापर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगांवे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे आदी उपस्थित होते.
 पालकमंत्री गडाख पुढे म्हणाले की, ऑक्टोबर अखेरपर्यंत कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे संकेत मिळत असल्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने  अधिक प्रभावी उपाययोजना राबवून  कोरोनाचा प्रतिबंध करावा . सध्या जिल्ह्यात राज्या एवढाच मृत्यूदर(2.87%) आहे. तर हा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर दीड टक्क्यापर्यंत खाली येण्यासाठी उपाय योजना कराव्यात, अती गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ते नियंत्रणात आले पाहिजे. जिल्ह्यात 60 वर्ष वयावरील 141 रुग्णांचा संसर्गाने  मृत्यू झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
  जिल्ह्यात कोविड-19 च्या चाचण्या वाढवल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाच ते सात गावे हॉटस्पॉट आहेत. हॉटस्पॉट असलेल्या गावातील सर्व लोकांची चाचणी करण्याचेही निर्देश श्री गडाख यांनी दिले. कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सध्या तीन औषधांची गरज असून त्यासाठी साडेसहा कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्याचे पालकमंत्र्यांनी मान्य केले. जिल्ह्यातील कोरोना रुग्णासाठी ऑक्सिन, व्हेंटीलेटरची उपलब्धता करुन देण्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
 जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ग्रामीण भागात सरपंच, ग्रामसेवकाडून प्रमाणपत्र दिल्यास संबंधीत  रुग्णास होम क्वारंटाईन करण्यात येत आहे.शहरी भागातही होम आयसोलेशनची सुविधा देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
  जिल्ह्यात साधारणपणे 48 ते 50 गावे हॉटस्पॉट असून त्यात उस्मानाबाद शहरासह तेरखेडा, उमरगा, तुळजापूरचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच अ‍ॅन्टीजेन चाचणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून परंडा, भूम, मध्ये चांगले कॉन्टक्ट  ट्रेसिंग होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने बैठकीत दिली.
 
Top