मानव जन्म हा सर्व श्रेष्ठ जन्म आहे. ८४ लक्ष योनी तून जन्म घेतल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्माची प्राप्ती होते. या जन्मात येऊन श्रेष्ठ कर्म करत कीर्तीवंत होऊन अनंतात विलिन होण्याचा सर्वाचा मानस असतो. हे शक्य होण्यासाठी आपल्याला सदगुरुचा सहवास आणि कृपाशिर्वाद मिळणे अतिशय गरजेचे असते पण याचे भाग्य सर्वांनाच मिळते असे नाही. परंतु याबाबतीत मी स्वताला खूप नशिबवान समजतो की मला अप्पा सारखे सदगुरु गुरु म्हणून लाभले. त्यांचा सहवास आणि कृपाशिर्वाद मिळाले.
माझ लग्न १९९३ मध्ये झाले. माझी सासुरवाडी लातूर जिल्यातील पानगाव. माझ्या सासूबाई श्रीमती निर्मला हेरकर यांची महाराजावर (अप्पा वर) खूप विश्वास श्रद्धा आणि भक्ती आहे. चापोली ते कपिलधार पदयात्रे दरम्यान अप्पांचा मुक्काम पानगाव ला असायचा. हीच संधी मला मिळाली आणि माझे सुदैव की सदगुरु राष्ट्र संत वसुंधरा रत्न डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज हे मला सदगुरु रूपात मिळाले. असे सदगुरु मिळणे हे माझे अहोभाग्यच म्हणावं लागेल.
ज्या सदगुरूचा जन्म २५ फेब्रुवारी १९१७ आई परयागबाई वडील विश्वनाथ स्वामी यांच्या पोटी झाला .१९२० मध्ये त्यांच्या आई वडिलांनी दिलेल्या वचना प्रमाणे त्यांना मडिवाळ शिवाचार्य गुरूंच्या स्वाधीन केले.१९२५ मध्ये महाराजांनी संस्कृत मध्ये शिक्षण घेतले आणि १९२७ ला माहेश्वरी दीक्षा घेऊन १९३२ ला महाराजांची मडिवाळ मठाचे उतर अधिकारी म्हणून घोषित केले.१९३८ मध्ये महाराजांनी आपले पहिले अनुष्ठान श्री क्षेत्र कपिलधार येथे केले. १९३९ मध्ये वारद पाठशाळा सोलापूर येथील अभ्यासक्रम एक वर्षात पूर्ण करून जंगम वाडी मठ वाराणसी (काशी) चा कार्यभार स्वीकारला त्याच वर्षी दुसरे अनुष्ठान काशी येथे केले.
१९४३ मध्ये पंजाब प्रांतात राष्ट्रीय स्वयवसेवक संघाच्या शाखेत काम केले. महाराजांनी आपली एम.बी.बी.एस. ही पदवी लाहोर पाकिस्तान मधून १९४५ मध्ये प्राप्त केली.पण महाराज आपल्या शैक्षणिक व्यवसायात कधीच रमले नाहीत. सतत देशाबद्दल प्रेम, लोकाबद्दल आस्था धर्माचे ज्ञान जनजागृती, लोकांना धर्माबद्दल उपदेश या गोष्टीत त्यांना रस होता. १९४७ मध्ये स्वातंत्र चळवळीत सक्रिय सह भाग नोंदवला आणि दोनदा देशासाठी तुरुंगवास भोगला. सामाजिक कार्य सोडून महाराजांनी १९४८ ते १९५३ या कालावधीत हिमालयात योग साधना पूर्ण करून महाराष्ट्रात आगमन केले. १९५५ ला महाराजांनी मोजके लोक घेऊन चापोली ते कपिलधार पदयात्रा चालू केली. आज हिच पदयात्रा लाखो लोक आपल्या मनात मन्मथ स्वामी बद्दल आदर,प्रेम,श्रद्धा ठेऊन दिमाखात कपिलधारला जातात. या पदयात्रेचा एक घटक म्हणून मला पण जाण्याचा योग आला. पदयात्रेत चालताना असे वाटत होते की आपण स्वर्गात आहोत जन स्वर्गसुखच. पदयात्रेत भक्तांचा एकच आवाज “गुरुराज माऊली गुरुराज माऊली”, ‘गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो” कोणी शिवपाठ म्हणायचे कोणी फुगड्या खेळायचे, स्वतः महाराज बऱ्याच ठिकाणी आपल्या अमृतवाणी मधून प्रवचन सांगायचे. महाराज पाऊले पण खेळायचे दिमाखदार रिंगण सोहळा पार पडायचा. लोक उघड्या माळावर झोपायची सकाळी ४ वाजता थंड पाण्याने आंघोळ करून मुखी शिवनामचा गजर करत मोठ्या आनंदाने पदयात्रेत चालायची. जणू मन्मथ माऊलीच साक्षात त्यांच्या सोबत आहेत. या भावनेने व या वातावरणात पदयात्रा कधी कपिलधारला पोहंचली है समजून यायच नाही . या पदयात्रेत एकमेकाबद्दल आदर आपुलकी आपलेपणा जाणवायचा. या प्रचंड अशा पदयात्रेवर महाराजांची कृपादृष्टी असायची व कोणत्याही शेतकऱ्याला आपल्या पदयात्रेचा त्रास होणार नाही याची दक्षता महाराज घ्यायचे. ज्यांना पण काही अडचणी असतील त्यांना महाराज एकच सांगायचे की मन्मथ माऊलीची पदयात्रा भक्ती भावाने करा. सर्व ठीक होईल आणि अनेक लोकांना त्याचा अनुभव आला. काही लोकांना मूल बाळ नव्हते त्याची त्यांना प्रचिती आली, कुणाची मोठी शस्त्र क्रिया टळली असे अनेक अनुभव भक्तांना आले. ज्या दिवशी पदयात्रा कपिलधारला पोहंचायची त्यादिवशी महाराजांच कीर्तन व्हायच सर्व भक्तगण पदयात्रेत आलेला थकवा विसरून जायचे आणि सर्वजण महाराजांची अमृत वाणी ऐकून ही शिदोरी घेऊन मोठ्या आनंदात वापस निघायचे.
                                      “मन्मथ अलासी भू लोका
                                       आता कोणी भिऊ नका”
अल्प संख्यांक जाती जमाती परिषदेचे उद्घाटन सांगली येथे १९७३ मध्ये झाले. १९७९ मध्ये स्व पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची भेट घेऊन वीरशैवाच्या स्वतंत्र नोंदीचे आश्वासन घेतले. २००९ मध्ये सपूर्ण महाराष्ट्रात मन्मथ ज्योत रथयात्रेचे आयोजन केले. अशी अनेक मोठी कारकीर्द महाराजांनी समाजासाठी करून ठेवलेली आहे. माजी मुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते महाराजांना राष्ट्र संत म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. या माझ्या माऊली ने आयूषात कुणाच्या पाच पैशाला हात लावला नाही व कसली अपेक्षा ही केली नाही. शेवट पर्यन्त महाराजांनी आपले अनुष्ठान चालूच ठेवले. या वर्षी महाराजांनी ८४ वे अनुष्ठान हिंगोली येथे केले. महाराजांनी लातूर, उदगीर, नांदेड, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद येथे अनेक सत्संग घेतले. माझी पत्नी सौ सुरेखा देशमाने तिच्या महाराजांवर असलेल्या भक्ती व श्रद्धेला पाहन तिला उस्मानाबाद जिल्हया साठी महाराजांच्या सत्संग समितीचे प्रमुख म्हणन महाराजांनी नेमले. आंध्र, कर्नाटक, विदर्भ, महाराष्ट्रात महाराजांचे खूप अनुयायी आहेत. महाराजांची सतत इच्छा असायची आपण जास्तीत जास्त लोकांपर्यन्त पोहचून समाजाची जन जागृती करावी. महाराजांनी आपल्या वय वर्ष १०४ पर्यन्त कधीच आपल्या अनुष्ठांनात व पदयात्रेत खंड पडू दिला नाही. एखाद्या तरुण पुरुषाला लाजवेल असी जिद्द उत्साह त्यांच्यामध्ये असायचा कधी न थकता खूप लांब लांबचा प्रवास महाराज करत असत.देशाबद्दल समाजा बदल कळकळ, निस्वार्थीपणा कशाचीपण अपेक्षा न ठेवणारे असे होते. अशा या थोर संता बद्दल लिहिण्यासाठी समुद्राच्या पाण्याची शाई आणि लिहिण्यासाठी आभाळचा कागद म्हणून वापर केला तरी तो कमीच आहे.जो एक मन्मथ स्वामीचा साक्षात अवतार या भूलोकावर होऊन गेला. ज्याचे आपण आज साक्षीदार आहोत. आपल हेच भाग्य की आपण या जन्मात साक्षात देवाच्या सहवासात राहिलो. असे थोर आत्मा कुठे न जाता सर्व भक्तांच्या हृदयात कायम स्वरूपी असतात. आपण पण त्यांच्यावर असलेल्या आपल्या भक्तीची पोच पावती म्हणून त्यांचा असलेला एखादा गुण आपल्या आचरणात आणावा आणि त्यांचे कार्य पुढे चालू ठेऊन आपले जीवन धन्य करून घ्यावे. म्हणून वाटते जसे संत ज्ञानेश्वर माऊलीचे आपले गुरु संत निवृती महाराजावर भक्ति व श्रद्धा होती तशीच माझी भक्ती माझ्या सदगुरू बद्दल आहे.
“मनोणी जाणते न गुरु भाजिजे
तीने कृतकार्य होई जे जैसे मूळ संचणी सहजे शाखा पल्लव संतोष ती
ज्ञानदेव म्हणी तरलो तरलो आता उरलो गुरु कृपे” खरोखरच आपला आधार, आपले श्रद्धा स्थान, आपले गुरु आपल्यात नाहीत ही उणीव न भरून येण्यासारखी आहे. तरी ज्यावेळी पण आपणाला आपल्या गुरु ची उणीव जाणवेल त्यावेळी आपण भक्तीस्थळ अहमदपूर ला नक्की भेट द्यावी. अशा या थोर महात्म्याला माझे कोटी कोटी प्रणाम
                                               डॉ अनिल देशमाने
                                                       प्राचार्य
                                          जेएसपीएम कॉलेज बार्शी
 
Top