उस्मानाबाद/ प्रतिनिधी
उमरगा व कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयातील काेविड रुग्णालयातून उपचारादरम्यान पलायन करणाऱ्या दोन कोरोनाग्रस्तांवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरगा तालुक्यातील माडज येथील शारदा सतिश कांबळे कोरोनाग्रस्त असल्याने त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, त्या उपचार सुरू असताना परस्पर निघुन गेल्या. अशा प्रकारे त्यांनी कोविड प्रसाराची शक्यता निर्माण करण्याचे निष्काळजीपणाचे कृत्य केले. यावरुन वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. कळंब येथील अशोक श्रीराम मोरे यांच्यावरही शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कळंब येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान दुपारी ते तेथून परस्पर निघुन गेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top