उमरगा /प्रतिनिधी-
 पाणीटंचाईच्या काळात टॅंकर व अधिग्रहण केल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षापासून पाणीपुरवठा केल्याचा मोबदला मिळत नसल्याने अगोदरच कोरोनाच्या संकटात असलेले शेतकरी व्यथित झाले आहेत. गतवर्षीचे साठ लाख रुपये तर यंदाच्या वर्षातील १७ लाख असे ७७ लाख रुपये थकल्याने अडचणीत आले आहेत.
मागिल दोन वर्षापासून तालुक्यात सरासरी पेक्षाही पर्जन्यमानाचे प्रमाण कमी असल्याने तालुक्यातील जवळपास ३० गावातील नागरीकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. यंदा २३ एप्रिलपासून पाणीटंचाई सुरू झाली होती. ती २३ जुलैपर्यंत सुरुच होती. मध्यंतरी बहुतांश भागातील मंडळ विभागात पाऊस झाल्यामुळे प्रशासनाने २४ जुलैपासुन ४० अधिग्रहण तर पाच टँकर बंद केले असलेतरी तालुक्यातील बेळंब व बोरी गावात पाणी टंचाईच्या झळा सुरू असल्याने बेळंबला दोन टँकर व बोरीला दोन अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरूच असून दोन गावासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान यंदाच्या पाणीटंचाईचे काळात अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांचा मोबादला म्हणून देण्यात येणाऱ्या रक्कमेपैकी एक ही रूपया तहसील कार्यालयाला प्राप्त झालेला नाही. शिवाय गतवर्षीच्या अधिग्रहणाचे साठ लाख रूपये थकित आहेत. अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीतील पिके जगविण्यासाठी असलेले पाणी थांबवून ग्रामस्थांची तहान भागविली, मात्र अधिग्रहणाच्या रक्कमेकरीता प्रशासनाकडे हेलपाटे घालून उपयोग होत नसल्याने पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली, वातावरणाच्या बदलाने किड रोगाचा प्रादुर्भाव त्यात कोरोना संसर्गा चे संकट अन दोन वर्षापासून अधिग्रहणाची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी व्यथित झाला असल्याने जिल्हा प्रशासनाकडे अधिग्रहणाची थकित रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची मागणी होत आहे.
 
Top