उस्मानाबाद /प्रतिनिधी -
आपल्या भाषांतराच्या कौशल्याने पूल देशपांडे यांचे साहित्य देशभरातील हिंदी भाषकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत सरकारने प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांच्या कार्याची दखल घेतली आहे. केंद्र सरकारच्या मानव विकास संसाधन मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या हिंदी निदेशालयाच्या वतीने वेदालंकार यांना एक लाखाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य हिंदीमध्ये भाषांतरित केल्याबद्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
जगद्गुरू तुकाराम महाराजांची संपूर्ण गाथा हिंदीमध्ये भाषांतरित केल्यानंतर आता माऊलींची ज्ञानेश्वरीदेखील हिंदी भाषिकांना वाचण्यासाठी लवकरच उपलब्ध व्हावी यासाठी प्राचार्य वेदालंकार सध्या काम करीत आहेत. मराठीतील महत्वाचे आणि सुप्रसिद्ध लेखक पू.ल. देशपांडे यांच्या विविध पुस्तकातील प्रसिद्ध निबंधांचे प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांनी हिंदीमध्ये भाषांतर केले आहे. त्यामुळे हसवणूक, गणगोत, असा मी असामी आणि व्यक्ती आणि वल्लीमधील अनेक विनोदी घटना आणि व्यक्ती हिंदी भाषिकांना अनुभवता येणार आहेत. रावसाहेब आहे चितळे गुरुजी या महराष्ट्राला ज्ञात असलेल्या व्यक्तिरेखा आता देशभरातील वाचकांच्या काळजात जागा मिळणार आहेत. पू. ल. देशपांडे के हास्य व्यंगात्मक लेख या शीर्षकाखाली कानपूरच्या विकास प्रकाशनाने प्राचार्य वेदालंकार यांचे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्याची दखल घेऊन केंद शासनाच्या हिंदी
निदेशालयाच्या वतीने हा महत्वपूर्ण सन्मान देऊन वेदालंकार यांचा गौरव केला आहे.
 प्राचार्य डॉ. वेदकुमार वेदालंकार यांनी यापूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा, वारणेचा वाघ, वारणेच्या खोऱ्यात या तीन कादंबऱ्यासह वीस निवडक कथांचा हिंदी अनुवाद केला आहे. त्याचबरोबर मराठीतील संगीत नाटकांचे मानदंड मानल्या जाणाऱ्या संगीत सौभद्र, कट्यार काळजात घुसली आणि शारदा या तिन्ही संगीत नाटकांचेही हिंदी भाषांतर पूर्ण केले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी मोठ्या उमेदीने त्यांनी ज्ञानेश्वरीचे भाषांतर करण्याचे काम हाती घेतले आहे. भारत सरकारच्या पद्म पुरस्कारासाठी देखील नुकतेच त्यांचे नामांकन स्वीकारण्यात आले आहे.
 
Top