तुळजापूर/ प्रतिनिधी

 तीर्थक्षेत्र तुळजापूरला पाणीपुरवठा करणारे नळदुर्ग येथील बोरी धरण तसेच तुळजापूर शहरालगतच्या पाचुंदा तलावातील जलसाठ्याचे तुळजापूरचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. बोरी धरण व पाचुंदा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने तुळजापुरात येणाऱ्या भाविकांसह शहरवासीयांचा पुढील दोन वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

तालुक्यात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश जलाशये भरली आहेत. तुळजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळदुर्ग येथील बोरी धरण तसेच शहरा लगतचा पाचुंदा तलाव १०० % भरले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या दोन्ही स्त्रोतातील जलसाठ्याचे पूजन नगराध्यक्ष रोचकरी यांनी केले. या वेळी कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अर्जुन माने, महादेव शिंदे, हणमंत पुजारी, समाधान जगताप, किरण औताडे उपस्थित होते.

 
Top