उस्मानाबाद /प्रतिनिधी -
येत्या गणेशोत्सवा दरम्यान फक्त उस्मानाबाद शहरातील पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविणाऱ्या लहान मुलांसाठी तसेच गौरीचा आकर्षक देखावा करणाऱ्या महिलांसाठी स्पर्धेचे आयोजन युवा सेनेच्यावतीने करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक मातीचा गणपती, गणेशमूर्ती स्पर्धा ही १ ते १५ वयोगटातील फक्त लहान मूला व मूलींसाठी असून यासाठी गणपती स्वत: हाताने तयार करायचा आहे. त्यासाठी कुठलाही कृत्रीम साचाचा वापर करायचा नाही. तसेच गणपती तयार करताना त्या मातीमधे वृक्षाचे बियाणे वापरायचे आहे. त्यामुळे त्याचे विसर्जन कुंडीत केल्यानंतर त्याचे वृक्ष रोपण होते. तर महिलांसाठी गौरी सजावट ही स्पर्धा असून महिलांनी सुंदर व आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार कराव्यात व आकर्षक गौरी सजावट करुन त्याचे फोटो आपल्या संपूर्ण नाव व पत्तासह गणेश राऊत - ९९७५४५१३१३, अक्षय ढोबळे - ९८५०५१९७१७ व अजय धोंडगे - ७०३८६०२४२४ यांच्या व्हाट्सअप नंबरवर पाठवावेत. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात येणार असून या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवासेना जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक अक्षय ढोबळे यांनी केले आहे.