उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी केलेल्या मागणीला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दि.२० ऑगस्ट रोजी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी माजी कुलगुरू डॉ. आर. एन. माळी यांच्या अध्यक्षतेखालीसमितीचे गठण केले आहे.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे-पाटील उपस्थित होते.तत्पूर्वी जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी (दि.१९) भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांना तातडीने बैठक घेण्याची सुचना केली. त्यानुसार गुरुवारीच या विषयावर सबंधित विभागाच्या प्रमुखासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, उपसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, विभागीय सहसंचालकांसह विशेष निमंत्रित म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेण्यात आली. गठीत केलेल्या समितीने त्या भागातील सर्व घटकांची मते जाणून घेऊन अहवाल द्यायचा आहे. या समितीत माजी कुलगुरु आर. एन. माळी यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे डी. टी. शिर्के, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी प्राचार्या डॉ. अनार साळुंखे, शिक्षणतज्ञ एम. डी. देशमुख, विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय निंबाळकर, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्यासह औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत.

 
Top