उस्मानाबाद /प्रतिनिधी-
तालुक्यातील मौजे दारफळ व मौजे राजुरी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नरसिंहवाडी अंतर्गत येतात.नरसिंहवाडी हे सारोळा तलाठी सज्जा अंतर्गत आहे. सारोळा तलाठी सज्जा अंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना ज्या दत्तक बँकांकडून पीक कर्ज दिले जाते त्या बँकाही नरसिंहवाडी हे आमच्याकडे दत्तक नाही असे कारण सांगुन पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे मागच्या एक दोन महिन्यांपासून शेतकरी मात्र या ना त्या बँकांचे खेटे मारत हवालदिल झाला आहे. 
यासंदर्भात दि. ०१/०८/२०२० रोजी युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॅड. संजय भोरे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची होणारी ही फरफट थांबवत नरसिंहवाडी ला तात्काळ एखादी चांगली दत्तक बँक देण्याची मागणी केली. तसेच सदर बँकेस नरसिंहवाडी मधील  सर्व शेतकऱ्यांना पीककर्ज तात्काळ वाटप करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी देखील मागणी अॅड.भोरे यांनी खंदारे यांच्याकडे केली आहे.

 
Top