उस्मानाबाद/प्रतिनिधी : -
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत. या प्रकल्पांना चालना देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. ही गरज ओळखून तातडीने संबंधित मंत्री तसेच अधिकाऱ्यांची व्हर्च्युअल मिटींग आयोजित करावी, अशी मागणी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे.
यासंदर्भात आमदार पाटील यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्याने शिवसेनेला भरभरून दिले आहे. आपण राज्याचे प्रमुख झाल्याने जिल्हावासीयांच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत. जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प, कौडगाव येथे देशातील पहिला टेक्निकल टेक्सटाइल पार्क उभारणे, कौडगाव येथे २५० मेगावॅटचा हायब्रीड सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संबंधित खात्याचे मंत्री,जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सचिव यांची व्हर्च्युअल बैठक घ्यावी व हे सर्व विषय मार्गी लावण्यासाठी कालबध्द कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
उस्मानाबाद जिल्हा भौगोलिक रचनेमुळे कायम दुष्काळाच्या छायेत येतो. परिणामी वाट्याला दुष्काळी परिस्थिती असते. नीती आयोगाने उस्मानाबाद आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केला आहे.जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी औद्योगिकीकरणाला चालना देणे व सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करून देणे हाच एकमेव उपाय आहे. तसेच उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणे यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. यांच्या अनुषंगाने संबंधित खात्याचे मंत्री, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व सचिव व वरिष्ठ अधिकारी यांची व्हर्च्युअल बैठक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
Top