उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जन्मतः ९०% पेक्षा अधिक कर्णबधीर असलेल्या मानसी एकनाथ चव्हाण हिने शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० मध्ये ८४.२०% टक्के गुण मिळवले. मानसीला अजिबातच ऐकू येत नसल्यामुळे श्रवणयंत्र कानाला लावावे लागते. तिने जिद्द, चिकाटी व  मेहनत घेऊन सतत अभ्यास करून घवघवीत यश मिळवले.
पुणे येथील स्वरानंद संस्थेच्या संचालिका डॉ. रक्षा देशपांडे यांनी लहानपणापासून ‘स्पीच थेरपी’ देऊन अचूक मार्गदर्शन केल्यामुळे मानसी व्यवस्थितपणे प्रमाण मातृभाषेत बोलायला शिकली. तिचे वडील एकनाथ चव्हाण  हे मुख्याध्यापक तर आई दिप्ती चव्हाण ह्या इंग्रजी शाळेत सहशिक्षिका असल्याने घरामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास तिला मदत झाली.
मानसीचे शिक्षण भाई उद्धवराव पाटील प्रशाला उस्मानाबाद येथे झाले. तिच्या यशाबद्दल जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर, मुख्याध्यापिका शुभांगी नलावडे, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष माळी, कक्ष अधिकारी  प्रदीप जाधव, बालाजी तांबे, तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक आदींनी अभिनंदन केले.

 
Top