उस्मानाबाद /प्रतिनिधी-
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न पाठपुरावा करुनही निकाली निघत नसल्याने प्रहार शिक्षक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, शिक्षणाधिकारी रामलिंग काळे यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपात्र ठरलेल्या ७६ शिक्षकांचे त्रुटींची पूर्तता ३१ ऑक्टोबर २०१९ पूर्वीच केली आहे. परंतु शिक्षण विभागाने अजूनही चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुरीचे आदेश निर्गमित करुन शिक्षकांना न्याय दिला नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. २५ ऑगस्ट २०२० पर्यंत सदरील ७६ शिक्षकांना वरिष्ठ वेश्रेतनणी मंजूर होऊन आदेश निर्गमित न झाल्यास ३१ ऑगस्ट २०२० रोजी फिजिकल डिस्टन्स पाळून एक दिवसीय धरणे आंदोलनाची भूमिका प्रहार संघटनेच्या वतीने घेण्यात आली आहे. आपसी आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेत बदल करून सेवा ज्येष्ठता यादी दुरूस्त करावी याबाबत प्रहार शिक्षक संघटना १ वर्षापासून पाठपुरावा करत आहे. आजतागायत याबाबत आदेश निर्गमित झालेला नाही. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम १९६७ मधील पोटनियम ८ (२) व ग्राम विकास विभाग यांचे परिपत्रक २८ जानेवारी १९ अन्वये आपसी आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची पूर्वीच्या जि.प.ची ज्येष्ठता कायम राहील किंवा ज्या कर्मचाऱ्यांच्या पदावर नेमणूक झाली असेल त्या कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता या दोन्हीपैकी जी कमी असेल ती ज्येष्ठता ग्राह्य धरून संबंधित शिक्षकांना न्याय द्यावा. निवेदनावर प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत, दत्तात्रय पुरी, विशाल अंधारे, दत्तात्रय राठोड, संतुक कडमपल्ले, हनुमंत माने, रघुनाथ दैन, विनोद सुरवसे, शहाजी झगडे, धनंजय आंधळे, फिरोज शेख, योगेश चाळक, धम्मदीप सवाई, गणेश गोरे आदींची स्वाक्षरी आहे.
 
Top