उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व्यापार्‍यांचे मोठे व्यावसायिक नुकसान होत आहे. त्यामुळे सकाळी 9 ते दुपारी 3 ऐवजी सायंकाळी 7 पर्यंत दुकानांची वेळ वाढविण्यात यावी, तसेच शनिवारऐवजी रविवारी जनता कर्फ्यूचा आदेश जारी करावा, यासह अन्य मागण्या जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
सोमवारी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी अन्य व्यापार्‍यांसमवेत जिल्हाधिकारी दिवेगावकर यांची भेट घेवून त्यांचे स्वागत केले. यावेळी लेखी निवेदन देत व्यापारी समस्यांवर चर्चा करण्यात आली. सध्या दुकानांची वेळ 9 ते 3 असल्याने सर्वसामान्य नागरिक व व्यापार्‍यांची गैरसोय होत आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या दिवसांत दुकानांवर ग्राहकांची गर्दी होते. त्यामुळे कोरोना संकटामुळे व्यापा-यांना घालून दिलेल्या सामाजिक अंतर राखण्याचे नियम पाळणे कठीण होत आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यांप्रमाणे सायंकाळी 7 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा आदेश जारी करणे गरजेचे आहे. मागील अनेक दिवसांपासून दर शनिवारी जनता कर्फ्यू आहे. मात्र बँका, शासकीय, खासगी कार्यालये उघडी असतात. त्यामुळे नागरिक घडाबाहेर पडतात. परिणामी जनता कर्फ्यूचा उद्देश सफल होत नाही. शनिवारऐवजी रविवारी जनता कर्फ्यूचा आदेश जारी केल्यास जनतेचाही प्रभावी प्रतिसाद मिळू शकतो. बाहेर जिल्ह्यातून येणा-या व्यापा-‍यांना पोलीसांकडून अडविले जात असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. परंडा शहरातील आठवडी बाजारही बंद केल्याने व्यापा-‍यांसह सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे व्यापा-‍यांच्या समस्यांची दखल घेवून मागण्या पूर्ण कराव्यात, अशी लेखी मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यापा-यांच्या समस्या ऐकून घेवून यावर तोडगा काढून नवे आदेश जारी केले जातील, अशी ग्वाही दिली.
 यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, अध्यक्ष संजय मंत्री, उपाध्यक्ष संजय मोदाणी, सचिव लक्ष्मीकांत जाधव, अभय राजे, शैलेश मेहता, विशाल थोरात, प्रमोद मोरे, फैजुद्दीन मणीयार आदी व्यापारी उपस्थित होेते

 
Top