गोविंद पाटील / प्रतिनिधी
जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत असलेली धाबे 24 तास सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी मुभा दिली आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गावरून अनेक मोठी मालवाहू वाहने धावतात. चालक व त्यांच्यासोबतच्या सहाय्यकांची सध्या होत असलेली गैरसोय लक्षात घेवून अशांसाठी धाबे सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र तेथेही कोरोना संसर्ग होऊ नये, याबाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
देशभरात टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल केली जात असताना उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र पुन्हा एकदा टाळेबंदीचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने दररोज दुपारी तीन वाजेपर्यंतच सर्व व्यवहारांना मुभा दिली असून दुपारी तीननंतर जिल्ह्यात कडकडीत लॉकडाउन पाळण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यास फौजदारी कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव पूर्वीच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवित आहे. देशभरात टाळेबंदी शिथिल केली जात असताना उस्मानाबादेत मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत. यापूर्वी किराणा दुकानांना सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत व्यवहार करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यावर आता निर्बंध आणण्यात आले आहेत. किराणा दुकानांना सकाळी 9 ते दुपारी तीन वाजेपर्यंतच व्यवहार करता येणार आहेत. दुपारी 3 नंतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी जारी केलेल्या पत्रकात बजावण्यात आला आहे. दूध विक्री करणार्या डेअरी आणि बेकरींना देखील दुपारी 3 नंतर आपल्या दुकानांना बंद ठेवावे लागणार आहे. बेकरी, साहित्य आणि दूध दुपारी 3 नंतर घरपोच विक्री करण्यास मात्र सवलत देण्यात आली आहे. जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे व खत विक्रीची दुकाने तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडत दुकाने व इतर आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत उघडी ठेवता येणार आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने नागरिकांनी दुपारी 3 नंतर वैद्यकीय तातडीची गरज वगळता इतर कारणांसाठी घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करावे, तसेच दर शनिवारी जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले आहे.