उस्मानाबाद /प्रतिनिधी
जिल्हा रुग्णालयात नवीन सिटीस्कॅन मशीन असून देखील कोरोना रुग्णांच्या योग्य निदान चाचणीसाठी स्कॅन केले जात नाहीत. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन एचआरसीटी स्कॅनिंग तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती. त्या अनुषंगाने उद्यापासून ही निदान प्रक्रिया सुरु होणार आहे.
जिल्हा रुग्णालयात दि. २१ ऑक्टोबर, २०१९ रोजी नवीन सी.टी. स्कॅन मशीन कार्यान्वित करण्यात आली होती. सदरील मशिन कॅनॉन कंपनीची असुन १६ स्लाइसची आहे. सध्यस्थितीत या मशिनद्वारे प्रति महिना ३५० ते ४०० पेशंटचे सीटी स्कॅन होेते. कोरोना संक्रमित रुग्णांची निदान व चाचणी करत असताना जलद प्रतिजैविक चाचणीसह छातीचा एचआरसीटी म्हणजेच उच्च-रिझोल्यूशन संगणकीकृत टोमोग्राफी स्कॅनिंग घेणे उपयुक्त असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. कोविड-१९ च्या संसर्गामुळे रुग्णाच्या छातीत विषाणूचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे, हे पाहून रुग्णांना योग्य औषधोपचार करणे शक्य होते. रुग्णांची स्थिती बिघडण्यापासून बचाव करण्यास मदत होते. याबाबत आमदार पाटील यांनी अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली. यामुळे तातडीने मशिन वापरण्यात यावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उस्मानाबाद दौऱ्या दरम्यान झालेल्या बैठकीत केली होती. यामुळे यंत्र सुरू करण्यात येणार आहे. 
 
Top