उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखाण्यासाठी संपूर्ण देशात दि.२३.०३.२०२० पासून पूर्णतः लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. परिणामी गेली ३ महिन्यापासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. समाजातील इतर सर्व घटकांसोबत फेरीवाले, व्यापारी, मजूर, उद्योजक, शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे राज्यातील सर्व ग्राहकांचे एप्रिल, मे व जून या तीन महिन्याचे वीज देयके माफ करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी उस्मानाबादच्या वतीने  निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी   यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजच्या माध्यमातून देशातील जनतेसाठी विनामूल्य धान्य उपलब्ध केले, गरजूंना थेट खात्यावर पैसे जमा करून आर्थिक दिलासा दिला. तदनंतर, रु. २० लाख कोटींच्या आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत विविध योजना जाहीर करून अनेक घटकांना केंद्र सरकारने सहकार्य उपलब्ध केले आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार मात्र जनतेला अद्याप थेट मदत करू शकले नाही हे मोठे दुर्दैव आहे. प्राप्त परिस्थितीत इतर मदत नाही तर किमान एप्रिल, मे व जून या तीन महिन्याचे वीज बिल माफ करून सामान्य नागरिकांना थोडातरी दिलासा राज्य सरकारने द्यावा ही जनतेची अपेक्षा आहे. सरसकट “चुकीचे - जास्त आलेले” वीज देयके दुरुस्त करून देतो म्हणण्यापेक्षा ३ महिन्याचे वीज बिल माफ करण्यात यावे ही मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड. व्यंकटराव गुंड, दत्ता कुलकर्णी, नेताजी पाटील, अॅड. खंडेराव चौरे, अॅड. नितीन भोसले, सतिश दंडनाईक आदींची उपस्थिती होती.
उशीरा जाग
तीन महिन्याचे वीज बिले माफ करण्याची केलेली मागणी म्हणजे बैल गेला आणि झोपी गेला अशा प्रकारची प्रतिक्रिया लोकांमधुन येत आहे. ७५ टक्के लोकांनी एप्रील व मे चे वीज बीले भरली आहेत. त्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्षांना उशीरा कशी जाग आली, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
 
Top