तेर /प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे सापडलेले पुरातन शहाबादी शिल्प अखेर पुरातत्त्व विभागाकडून तेरच्या कै. रामलिंगआप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात संवर्धनासाठी आणण्यात आले आहे. त्यामुळे तेरसह तीर्थ बुद्रुक येथील संशोधकांनासह पर्यटन वाढीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे .
तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे बौद्ध स्तूप शिल्प प्राचिन बांधकामांचे अवशेष आढळून आले होते . हजारो वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची गरज लक्षात घेऊन पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचलानालयाचे संचालक डॉ तेजश गर्गे यांच्या सुचनेनुसार तेर येथील संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तीर्थ बुद्रुक येथील क्षेत्रास भेट देऊन स्थळांची पाहणी केली. यावेळी पाहणी दरम्यान तेर येथे उत्खननात सापडलेल्या बौद्ध धर्माचे अवशेष व तीर्थ बुद्रुक येथील पुरातन अवशेषात साम्यता असल्याचे दिसून आले तसेच तेर येथील सातवाहन कालीन विटा व तीर्थ बुद्रुक येथील विटा यांच्या मोजमापे व बनविण्याच्या पध्दतीतही साम्यता असल्याचे निदर्शनास आले .दरम्यान याचं ठिकाणी  साधारण इ .स. दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातील शहाबादी फरशीवरील शिल्प आढळून आले असून हे शिल्प सातवाहन काळातील असून या शिल्पाच्या वरच्या बाजूस हंस पट्टी असून त्यांच्या चोचीत कमळ कळ्या आहेत. खालील बाजूस राजा , राणी व दोन सेविका दिसत आहेत. त्यांची वेशभूषा व अलंकार सातवाहन कालीन दिसून येत असल्याचे अमोल गोटे यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे शहाबादी शिल्प जिल्हा प्रशासनासह ग्रामस्थांच्या सहमतीने तेरच्या पुराणवस्तू संग्रहालयात संवर्धनासाठी आणण्यात आले असून हे शिल्प तीर्थ बुद्रुक या स्थळांच्या उल्लेखासह संग्रहालयात जतन करून ठेवण्यात येणार असून याची नोंद पुरावशेष नोंदवही मध्ये घेण्यासाठी पुरातत्व विभागाचे  संचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात  येणार असल्याचे संग्रहालयाचे साहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या शिल्पामुळे तेरसह तीर्थ बुद्रुक येथील  पर्यटन वाढीसह पुढील संशोधनास दिशा मिळणार आहे.
 
Top