उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरूवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिवसभरात 174 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आजपर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या हजारीपार 1163 वर पोहचली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा उपचारखालील रुग्णसंख्या बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांपेक्षा अधिक नोंदवली गेली आहे. हे प्रमाण काळजी वाढविणारे आहे.
उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील कोविड चाचणी केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या 508 स्वॅबचे अहवाल गुरूवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. यातील तब्बल 174 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अहवालामध्ये उस्मानाबाद शहर व तालुक्यात सर्वाधिक 49, उमरगा 47, तुळजापूर 35, कळंब 21, वाशी 14, परंडा 6 तर लोहारा तालुक्यात 2 रुग्ण आढळून आले आहेत. उस्मानाबाद आणि उमरगा तालुक्यात संसर्गाचा वेग अधिकच वाढला आहे.
सर्वसामान्यांसह वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांनाही कोरोनाची बाधा होत आहे. जुलै महिन्यात उस्मानाबाद, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आलेले होते. त्यानंतरही संसर्ग आटोक्यात येत नसल्याने आता उस्मानाबाद आणि उमरगा नगर पालिकेच्या हद्दीत चक्क दुचाकी बंदीचा आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी जारी केला आहे.
31 जुलैच्या दुपारपर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1163 वर पोहचली असून 514 जणांना उपचाराने बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर 600 जणांवर उचार सुरू असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे
 
Top