उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शेतीच्या बांधाच्या कारणावरून चुलत भावाशी झालेल्या भांडणात जखमी झाल्याने दवाखान्यात उपचारादरम्यान जवाब घेण्यासाठी शेतकऱ्याकडून ३ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिसाला रंगेहाथ पकडण्यात आले. उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून शहरातील ताजमहल चित्रपटगृहासमोरील सिटी हॉटेल येथे कारवाई करण्यात आली.
शेताच्या बांधावरून दोघा चुलत भावांमध्ये वाद झाल्यानंतर एका भावास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शेतकऱ्याने जवाब घेण्याची विनंती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक आतिष दशरथ सरफाळे यांना केली. सरफाळे यांची ड्युटी जिल्हा रुग्णालयात असल्याने व त्यांच्या जवाबाशिवाय संबंधित शेतकऱ्याची तक्रार पोलिसात घेतली जात नसल्याने त्यांनी सरफाळे यांना वारंवार विनंती केली. त्यानंतर सरफाळे यांनी जवाब घेण्यासाठी तसेच डॉक्टरांचे सर्टिफिकेट घेण्यासाठी शेतकऱ्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती
३ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दिली. त्यानुसार सापळा रचून सरफाळे याला गुरूवारी ३ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीमध्ये मारहाणीच्या गुन्ह्यात पोलिसांकडून जवाब घेण्यासाठी लाच घेण्याचे प्रकार नेहमीच घडतात.दरम्यान, ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक हुलगे, पोिलस हवालदार रवींद्र कठारे, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विष्णू बेळे, समाधान पवार, महेश शिंदे व चालक ज्ञानदेव कांबळे यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

 
Top