परंडा / प्रतिनिधी : -
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात सर्व जनतेला वा-यावर सोडले आहे.जनतेला राज्य सरकारने काहीच मदत केली नाही.राज्यातील दुध उत्पादक शेतकरी ही अडचणीत आहे.देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दुधाला सरसकट प्रती लिटर 5 रु.अनुदान व दुध भुकटी निर्यातीस अनुदान दिले गेले.आता तर दुधाचे दर त्यावेळेपेक्षाही खालावलेले आहेत.मात्र राज्यातील नाकर्त्या सरकारने दुध दत्पादक शेतक-यांना ही वा-यावर सोडुन दिले आहे.
भाजपा-महायुतीच्या वतीने 21 जुलै ला परंडा तहसिलदार यांना दुध भेट देऊन 1 ऑगस्ट 2020 ला आंदोलनाचा इशारा दिला होता. शासनाचा दुध प्रश्नावर काहीच निर्णय न झाल्याने आम्ही दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11.30 वा. भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत तालुक्यातील परंडा येथे शिवाजी चौक, अनाळा येथील शिवाजी चौक व वारदवाडी येथील चौकात या तीन ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.परंडा येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, रिपाई (आ) प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसोडे,जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ चौधरी, भाजपा तालुकाअध्यक्ष राजकुमार पाटील, रिपाई तालुकाध्यक्ष फकीरा सुरवसे,आकाश बनसोडे,रासप विधानसभा प्रमुख बप्पाजी काळे, तालुकाध्यक्ष शिवाजी माने व वारदवाडी येथे सुखदेव टोंपे, राहुल कारकर,अरविंद रगडे,शिवाजी पाटील,बाळु निकाळजे, तानाजी सोनवणे तसेच अनाळा येथे परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संतोष सुर्यवंशी,ॲड.गणेश खरसडे,रमेश पवार, अनिल पाटील,सतिश देवकर, निशिकांत क्षिरसागर,दादा सुरवसे,सागर रंदील यांच्या प्रमुख उपस्थितीत दुध उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावर अहिंसक पध्दतीने ‘महाएल्गार आंदोलन’होणार आहे.
तत्पुर्वी 1 ऑगस्ट रोजी सकाळी 7.00 वा. प्रत्येक दुध संकलन केंद्रावर गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर 10 रु. अनुदान द्या, दुध भुकटी निर्यातीला प्रती किलो 50 रु. अनुदान द्या, दुध खरेदीचा दर प्रती लिटर 30 रु. करा या प्रमुख मागण्यांचे व राज्यसरकाच्या धिक्काराचे फलक घेऊन आंदोलन करावे व 11.30 वा. तालुक्यातील दुध उत्पादक शेतक-यांनी मोठ्या संख्येने या रास्तारोको आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील यांनी केले आहे.

 
Top