उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 कोरोना विषाणू संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. अनेक डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यातच रुग्णालयात उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने अनेक नागरिक आजार लपवून घरगुती उपचार घेत आहेत. परिणामी उस्मानाबाद शहरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्ष मकरंद शुरसेन राजेनिंबाळकर यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले की, सध्या जगभरात कोव्हिड-19 या साथरोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. उस्मानाबाद जिल्हा शासकिय रूग्णालयाची क्षमता 200 खाटांची असून सदर रुग्णालयामध्ये 200 खाटांचा आकृती बंध मंजूर आहे. सदर आकृती बंधानुसार जिल्हा रूग्णालयामध्ये अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक वर्ग-अ, बाह्रय संपर्क वैद्यकिय अधिकारी वर्ग-अ, परिसेविका प्रमुख तसेच वर्ग-ब 7 डॉक्टर, वर्ग-क नर्सेस व इतर 45 पदे, वर्ग:ड स्विपर्स व वार्डबॉय 125 एवढी पद रिक्त असून सध्या कोव्हिड-19 च्या महामारी मध्ये जिल्हा रूग्णालयात 400 खाटांची सोय करण्यात आली आहे. कोव्हिड-19 चा संसर्ग जिल्ह्यात वाढत असताना शहरामध्ये इतर कुठल्याही दवाखान्यात कोविड-19 वर उपचार दिला जात नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. वाढलेल्या रुग्णांची संख्या व कमी असलेला कर्मचारी वर्ग त्यामुळे बरीच कामे ही डॉक्टरांना स्वतः करावी लागत आहेत. परिणामी जिल्हा रुग्णालयामधील बरेच डॉक्टर व कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव झाल्याची मागच्या काही दिवसांत पहावयास मिळत आहे.
वास्तविक पाहता सध्याच्या महामारीच्या परिस्थितीमध्ये रुग्णालय स्वच्छ ठेवणे तेथे वेळोवेळी निर्जकिकरण करणे व रुग्णांना वेळोवेळी उपचार मिळणे अपेक्षित आहे. परंतू बर्‍याच प्रकरणामध्ये तसे होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीची चर्चा बाहेर पसरुन सामान्य नागरिक कोव्हिड-19 ची लक्षणे असताना देखील सदर लक्षणे लपवून घरगुती उपचार करत असलेले दिसून येते परिणामी मोठयाप्रमाणात संसर्गची वाढ शहरात होत आहे. त्यामुळे शासनस्तरावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व रिक्त पदांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी. पद भरतीच्या अनुषागंगाने सदर पद भरतीस वेळ लागत असल्यास जिल्हा स्तरावर कोव्हिड-19 महामारी विशेष बाब म्हणुन तात्पुरत्या स्वरूपाची पद भरती करून उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयामधील अडचणी दूर कराव्यात असेही नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी म्हटले आहे.
 
Top