उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंतर्गत उद्योग विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापुर आणि लोहारा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या केंद्राचे कार्यालय तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे तर लोहारा तालुक्यातील जेवळी  येथे उभारण्यात येणार आहेत. या उद्योग विकास केंद्राच्या माध्यमातून नवीन अकृषी उद्योग उभारणीस सहकार्य, विद्यमान उद्योगांना वाढीसाठी सहकार्य, उद्योग व्यवसाय आराखडा तयार करणे, व्यवसायिकांना तज्ञ मार्गदर्शकांकडून तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय आधारित प्रशिक्षण, मोठ्या बाजारपेठेशी  जोडणी, विपणन व्यवस्था, पॅकेजींग, लेबलींग, ब्रॅंडिंग इ. विविध आवश्यक सेवा पुरविण्यात येणार असल्याचे  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान  व्यवस्थापन कक्ष उस्मानाबाद अंतर्गत जिल्हा उद्योग विकास केंद्राचे (One Stop Facility Center – OSF) उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांचे हस्ते आज येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक अल्ताफ जिकरे, लेखाधिकारी अप्पासो पवार, जिल्हा व्यवस्थापक विपणन समाधान जोगदंड, जिल्हा व्यवस्थापक सनियंत्रण व मूल्यमापन अमोल सिरसट, जिल्हा समन्वयक कृतीसंगम गोरक्षनाथ भांगे, तालुका अभियान व्यवस्थापक पूजा घोगरे, तालुका समन्वयक राहुल मोहरे तसेच जिल्हा उद्योग विकास केंद्रातील व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंजना  युवराज माने, सचिव सुशीला गुलाब चव्हाण तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.
या केंद्राचे संचालन जिल्हा तसेच तालुका स्तरावरील समन्वयक, जिल्हा तसेच तालुका उद्योग विकास केंद्र व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. उद्योग विकास केंद्रांना विविध विषयातील तज्ञांचे उदा.  अनुभवी उद्योजक, सनदी लेखापाल, विधीज्ञ तसेच बँक अधिकारी यांचे तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आहे. यावर्षी उद्योग विकास केंद्राच्या माध्यमातून 450 उद्योगांना सहाय्य केले जाणार असल्याने  ग्रामीण उद्योजक महिलांनी  या उद्योग विकास केंद्रांच्या माध्यमातून आर्थिक विकास साधावा असे आवाहनही डॉ.संजय कोलते यांनी यावेळी केले.यावेळी या उदघाटन कार्यक्रमासाठी  गावस्तरावरील उमेद महिला गुगल मीट द्वारे उपस्थित होत्या.

 
Top