उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
सध्या कोरोना विषाणूंचा प्रसार होऊन त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील होऊ लागला आहे. त्यामुळे या रोगापासून बचाव करण्याबरोबरच रोग प्रतिकार शक्ती वाढवावी व आरोग्याच्या बाबतीत कोणीही दुर्लक्ष न करता प्रत्येकांनी काळजी घ्यावी असे कळकळीचे आवाहन तहसिलदार गणेश माळी यांनी केले.
उस्मानाबाद तालुक्यातील झरेगाव येथे तहसिलदार गणेश माळी व उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी आरोग्य बाबत चर्चा केली. त्यावेळी बोलताना माळी म्हणाले की, कोरोना विषाणूचे संक्रमण ग्रामीण भागात देखील होऊ लागल्यामुळे प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच या विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी किंवा त्याची लागण आपल्या परिसरात होऊ नये यासाठी प्रत्येकांनी घरा बाहेर फिरताना तोंडाला मास्क बांधण्या बरोबरच हात सॅनिटायझर करणे व आपल्या परिसरात स्वच्छता ठेवून परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी विशेष दक्षता बाळगावी. विशेष म्हणजे आपल्या गावात जर एखादी व्यक्ती बाहेरगावाहून आली तर त्या व्यक्तीच्या संपर्कात कोणीही न जाता त्याबाबत आरोग्य विभागास कळवून त्या व्यक्तीस संस्थात्मक क्वॉरन्टाईन करण्यास भाग पाडणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर यावेळी बोलताना मोतीचंद राठोड म्हणाले की, या महामारीच्या काळात कोणीही अवैध मार्गाचा किंवा अवैध धंदे करण्याचा प्रयत्न करीत असेल तर नागरिकांनी थेट पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून आपल्या गावात शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोनि दत्तात्रय सुरवसे, पो.कॉ. दिपक खांडेभरार, पोलिस पाटील राजेंद्र सोनवणे, कोरोना दक्षता समितीचे सदस्य
दत्तात्रय सोनवणे, अरुण सारफळे, अमोल देशपांडे, विजय तांबे, प्रकाश सोनवणे, ओम ढोकळे, अनिकेत ढोकळे, धनाजी सोनवणे  व  रामचंद्र ढोकळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top