लोहारा/ प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील धानुरी येथे पुन्हा एकदा कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने दिनांक 30 जून 2020 रोजी गाव सील केले आहे. दरम्यान, रूग्णाच्या संपर्कात आलेल्या 46 जणांपैकी 36 जणांना होम क्वारंटाइन तर हायरीस्क असलेल्या आठ जणांना शहरातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. उर्वरीत दोघे जण सोलापुरात असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक कटारे यांनी दिली.
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील एका 54 वर्षीय नागरिकाला 21 जूनला ताप, अंगदुखीचा त्रास सुरू झाला. ते दिवसभर घरीच थांबल्यानंतर संध्याकाळी जेवळी येथील डॉ. मोघे यांचेकडे तपासणी करून औषधोपचार घेतला. परंतु त्रास काही कमी झाला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी 22 तारखेला उमरगा येथील खासगी रूग्णालयात दाखल दाखल करण्यात आले. दिनांक 25 जून रोजी संध्याकाळी पाच वाजता तेथून रूग्णाला थेट सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दिनांक 27 जून रोजी स्वॅब घेण्यात आला. रविवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला. यापूर्वी 13 जूनला बाधित रूग्ण सोलापूर येथील कापडदुकानात गेला होता. तेथूनच कोरोनाची बाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागाने तातडीने बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या सुमारे 46 जणांचा शोध घेतला. यापैकी 36 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर अतिसंपर्कात असलेल्या कुटुंबांतील आठ जणांना शहरातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून रूगणासोबत असणाऱ्या दोघांना सोलापुरातच ठेवण्यात आले आहे. सोमवारी रात्री दहा वाजता तहसीलदार विजय अवधाने, तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक कटारे यांच्या पथकाने गावाला भेट देत गाव सील केले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून सर्वे करण्याचे काम हाती घेतले आहे. सर्वेद्वारे गावातील 84 घरे व 447 नागरिकांची आरोग्य तपासणीसाठी निवड करण्यात आली आहे.

 
Top