उस्मानाबाद/ प्रतिनिधी -
राज्यात कोरोना (कोविड-19) विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विपरीत परिस्थिती निर्माण झाली असून सन 2020-2021 हे शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत दिनांक 15 जून, 2020 च्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. केंद्र शासनाने शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, शैक्षणिक संस्था इत्यादी  दिनांक 31 जुलै, 2020 रोजी  पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात वस्तुस्थिती विचारात घेता सुस्पष्टता येणे आवश्यक असल्याने  याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचाराधीन होती.
त्यामुळे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दिपा मुधोळ-मुंडे यांनी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, शैक्षणिक संस्थामध्ये अध्यापनाचे कार्य 31 जुलै, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपापल्या शाळा, महाविद्यालय येथे नियमित उपस्थित राहून ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम पूर्ण करणे, स्वतःचे ज्ञान वाढविणे, शैक्षणिक व कार्यालयीन कामकाज इत्यादी करण्याची कार्यवाही करावी. ज्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मधुमेह, श्वसनाचे विकार असलेले, रक्तदाब,हृदयविकार इत्यादीसारखे दुर्धर आजार आहेत किंवा ज्यांची प्रकृत्ती खराब आहे. अशा शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी  संबंधित मुख्याध्यापक यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करुन त्यांच्या परवानगीने वर्क फ्रॉम होम (Work from Home) च्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीचा अवलंब करुन शैक्षणिक कार्य, अभ्यासक्रम पूर्ण करावा.
  या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 चे कलम 51, 55 तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897  अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम, 2020 च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.

 
Top