उस्मानाबाद/ प्रतिनिधी -
 खरीप हंगाम 2020-21 साठी शेतकऱ्यांनी अधिकृत निविष्ठा विक्री केंद्रातून बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांची खरेदी करताना जागरुक  राहून खरेदी करण्याच्या सूचना तालुका कृषि अधिकारी सुनिलकुमार जाधव यांनी शेतकऱ्यांना दिल्या आहेत.
बी-बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी :
बियाण्याच्या पिशवीवर उत्पादकाचे नाव प्रमाणित आहे का ? त्याची नोंद, वजन, किंमत इत्यादी माहिती असते ती पडताळून पहावी. बियाणे पेरणीपूर्वी पिशवीवरुन न फाडता डाव्या किंवा उजव्या बाजूने थोडी फाडा. प्रमाणपत्र नोंद असलेले लेबल पिशवीला तसेच कायम ठेवा, त्याचप्रमाणे पिशवीत बियाणाचे 20-25 दाणे पीक निघेपर्यंत जपून ठेवा,
 बियाणाची उगवण न झाल्यास त्याची तक्रार अधिकाऱ्यांकडे करताना पुरावा माणून उपयोगी  पडेल. पिशवीवरील नमूद भावापेक्षा जादा भाव देवू नये. बियाणे खरेदीचे पक्के बिल घ्या, बिलावर दुकानाचे नाव, खरेदीदाराचे नाव, बियाणाचे नाव, लॉट नंबर इत्यादी मजकूर व दुकानदाराची सही, तारीख किंमत त्यावर नमूद असावी. बिलाचा आग्रह करा व बिल जपून ठेवा. बियाण्याच्या पिशवीवर प्रमाणिकरणाचे निळे टॅग शिवलेले असावे व सत्यता दर्शक पिवळे लेबल लावलेले असावे. टॅगवर, बियाणे, जातीचे नाव, बी परीक्षण तारीख, उगवणशक्ती वजन नमूद असावे. छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम घेतल्यास कृषि अधिकारी, पंचायत समिती, तालुका कृषि अधिकारी यांचेकडे तक्रार करावी.
खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी :
खताचे नाव, प्रकार, तपासून पहावे. खताची गोणी मशीनने शिवलेली असावी. खत खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. त्यावर दुकानदाराचे नाव, खरेदीदाराचे नाव, खतांचा प्रकार, किंमत, तारीख, वजन, नमूद असावे. खतांचे बिल व बियाणे गोणी पीक निघेपर्यंत जपून ठेवावे. खताच्या गोणीवरील वजन, नमूद वजनापेक्षा पोते हलके असल्यास गोणी वजन करुन घ्या, खताच्या गुणवत्तेविषयी, वजनाविषयी तक्रार असल्यास कृषी अधिकारी, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी.
कीटकनाशके, रोगनाशके, संजीवके खरेदी करताना घ्यावयाची काळजी :
डबा, बाटली, पाकीट व्यवस्थित असावे. गळके, फोडलेले नसावेत. त्यावर उत्पादकाचे नाव, बॅच नंबर, प्रमाण घटक, निर्मिती तारीख, अंतिम तारीख इत्यादी माहिती छापलेली असावी. मुदत गेलेली कीटकनाशके खरेदी करु नयेत. खरेदीची पावती घ्यावी. त्यावर दुकानदाराचे नाव, कीटकनाशकाचे नाव, बॅच नंबर, निर्माती तारीख, अंतिम तारीख, वजन इत्यादी माहिती लिहून घ्यावी. बिल व कीटकनाशकाची रिकामी बाटली, डबा, पॅकेट, पीक निघेपर्यंत जपून ठेवा. त्यात थोडेसे कीटकनाशक शिल्लक ठेवा. बिलावर खरेदीदाराचे नाव, तारीख लिहून त्यावर सही करा. बियाणे, खते, कीटकनाशके यासंबंधी काही तक्रार असल्यास आपला अर्ज तालुका कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे करावा. तत्पूर्वी या लेखात नमूद केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी खरेदी करताना दक्षता घ्यावयास हवी, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी, उमरगा जि.उस्मानाबाद यांनी केले आहे.

 
Top